मेंढका नदीपात्रात अनधिकृत कचरा डेपो, धुराने प्रदूषण वाढल्याने कारवाईची मागणी
अहिल्यानगर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर अरणगाव बायपास चौकापासून सोलापूर रोडकडे एक किलोमीटर अंतरावर मेंढका नदीच्या पात्रात महानगरपालिकेने अनधिकृतपणे कचरा डेपो उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी 200 पेक्षा जास्त डंपर कचरा टाकण्यात आला असून, या कचऱयाला कोणीतरी पेटवून दिल्याने गेल्या महिन्यापासून या भागात आग धुमसत आहे. आग आणि धुरामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित होत असून, आसपासच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अहिल्यानगरमधील पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱया ‘अरण्य फाउंडेशन’चे अनिकेत गायकवाड यांनी हा प्रकार उघडकीस आणून जिल्हाधिकारी आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून, या ढिगाऱयात प्लास्टिक, काच, मेडिकल वेस्ट, प्राण्यांची हाडे, कपडे, कुजलेला जैविक कचरा, अशा स्वरूपाचा कचरा असल्याचे नमूद केले आहे. हा कचरा सतत जळत असल्याने धुरामुळे नागरिकांना त्रास सुरू झाला आहे.
कचरा डेपो असलेल्या ठिकाणापासून केवळ 20 फुटांवरून मेंढका नदी वाहते. या जळणाऱया कचऱयाची राख व रसायनयुक्त घटक नदीत मिसळत असून, पुढील पावसाळ्यात हा विषारी कचरा नदीत मिसळून गायडाळ तलाव, सिना नदीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
गंभीर आजाराची भीती
कचरा जाळल्यामुळे कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सायनाइड, डायऑक्सिन्स, जड धातू इत्यादी घातक रसायने वातावरणात आणि मातीमध्ये मिसळतात. या विषारी घटकांमुळे कॅन्सर, हृदयरोग, किडनी विकार, दमा, त्वचारोग आणि प्रतिकारशक्ती कमी होणे, यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच सल्फर व नायट्रोजनयुक्त वायूंमुळे ऍसिड रेन होण्याचीही शक्यता आहे.
व्यवस्थापनात गंभीर त्रुटी
महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकत्र संकलित केला जातो. कॉम्पॅक्टर गाडय़ांमधून कचरा ठासून भरून थेट डेपोमध्ये टाकला जात असल्याने त्याचे वर्गीकरण अशक्य होते. त्यामुळे डेपोमध्ये कचऱयाचे मोठे ढीग तयार होतात आणि शेवटी त्याला आग लावून जाळले जाते. ‘माझी वसुंधरा’, ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ सर्वेक्षण,’ अशी अभियाने राबविताना महापालिका मात्र कचरा जाळून पर्यावरणाचा विनाश करत असल्याचा आरोप ‘अरण्य फाउंडेशन’चे अनिकेत गायकवाड यांनी केला आहे.
Comments are closed.