विशाखापट्टणम मध्ये कसे आहेत भारतीय संघाचे आकडे? कोणाच्या नावावरती आहेत सर्वाधिक धावा आणि विकेट
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आता रोमांचक वळणावर पोहोचली आहे.
रांची येथे खेळला गेलेला पहिला एकदिवसीय सामना भारतीय संघाने 17 धावांनी जिंकला होता. तर, रायपूर येथे खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने 4 गडी राखून जिंकला होता. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. शनिवारी, विशाखापट्टणम येथे तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जाणार आहे.
विशाखापट्टणममध्ये एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड अतिशय शानदार राहिला आहे.
टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यापैकी 7 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये अद्याप एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.
विशाखापट्टणमचे एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते.
या पिचवरचे दोन सर्वात मोठे स्कोर भारतीय संघानेच केले आहेत.
(18 डिसेंबर 2019) रोजी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 5 गडी गमावून 387 धावा केल्या होत्या. (5 एप्रिल 2005) रोजी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाने 9 गडी गमावून 356 धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी ठरला होता.
सर्वात कमी स्कोअरचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. (29 ऑक्टोबर 2016) रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ फक्त 79 धावांवर ऑल आऊट झाला होता. दुसरा सर्वात कमी स्कोअर भारताचा आहे. (19 मार्च 2023) रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघ 117 धावांवर गारद झाला होता. धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय भारताने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नोंदवला होता. भारतीय संघ 190 धावांनी जिंकला होता. विकेट्सच्या फरकाने सर्वात मोठा विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये भारताला 10 विकेट्सने हरवले होते.
Comments are closed.