मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण का करत नाही? रेल्वे मंत्रालयाला नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचा सवाल

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने सीवूड आणि मोहापे या रेल्वे स्थानकांच्या नामकरणासाठी केंद्र सरकारला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने या दोन्ही स्थानकांचे नामकरण केल्याचे नुकतेच जाहीर केले. मात्र राज्य सरकारने मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस, असे नामकरण करण्याचा प्रस्ताव १२ मार्च २०२० रोजी मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. पाच वर्ष झाली तरी अद्याप टर्मिनसचे नामकरण झालेले नाही. यावरूनच आता नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. मनमोहन चोणकर यांनी आक्रमक भूमिका घेत लवकरात लवकर टर्मिनसचे नामकरण झालेलेच पाहिजे, अशी मागणी केली आहे.
एका निवेदनाद्वारे ॲड. मनमोहन चोणकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “महाराष्ट्र सरकारने मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस नामकरणाचा प्रस्ताव १२ मार्च २०२० मंजूर करुन केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवला, त्याला पांच वर्ष झालीत तो अजूनही प्रलंबित का आहे?”
ते म्हणाले आहेत की, “लोकसभेच्या सभागृहात अनेक खासदारांनी प्रश्र्न उपस्थित करुन नामकरणाची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून मंजुरी लवकर द्यावी, असा पत्रव्यवहार केला आहे. तरी सुद्धा याची दखल घेतली जात नाही. विधानसभेत तर सर्वच मुख्यमंत्र्यांनी मंजुरीची ग्वाही दिली आहे.”
चोणकर म्हणाले, “महाराष्ट्र राज्याच्या चार मुख्य सचिवाने सुद्धा स्मरण पत्राद्वारे गृहमंत्रालय कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. (हा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध आहे) असे असताना रेल्वे मंत्रालय मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण का करत नाही, का मंजुरी देत नाही? याचं स्पष्टीकरण करावे. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना विनंती आहे की, अधिवेशनात महाराष्ट्रातील अस्मितेचा प्रश्न लावून नानाप्रेमी आणि रेल्वे प्रवाशांची मागणी मंजूर करुन घ्यावी.”

Comments are closed.