वसई विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण! शिक्षण विभागाची मोठी कारवाई, तीन अधिकाऱ्यांना केलं निलंबित
पालघर: वसईच्या सातीवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेत एका शिक्षिकेने शिक्षा म्हणून दिलेल्या उठाबशांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली
शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यींनीला उठाबशा काढायची शिक्षा दिली होती. त्यानंतर विद्यार्थिनी काजल उर्फ अंशिका गौड हिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या घटनेची माहिती वरिष्ठांना न देणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे आणि अनधिकृत शाळांवर कारवाई न करणे याबद्दल वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसई पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र उबाळे आणि वालीव केंद्रप्रमुख कैलास चव्हाण या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
सातीवली परिसरात अनधिकृतपणे वर्ग चालत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. तरीही शिक्षण विभागाकडून योग्य ती कारवाई न झाल्याने नागरिकांनी वारंवार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर पाऊल उचलत प्रशासनाने दाखवून दिले आहे की अशा निष्काळजीपणाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही.
नेमकं प्रकरण काय?
शाळेमध्ये पोहचण्यासाठी दहा मिनिटे उशीर झाल्याचा राग शिक्षिकेला आला. राग अनावर न झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. या जीवापेक्षा मोठ्या शिक्षेमुळे विद्यार्थीनीची तब्येतच बिघडली व तिला रुग्णालयात दाखल कराव लागलं, पण दुर्देवाने उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना वसई पश्चिममधील सातीवली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली होती. पोलिसांनी शाळेत व रुग्णालयात जाऊन याप्रकरणी अधिक चौकशी केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेला भेट दिली. मात्र, शनिवार असल्याने कोणीही भेटले नाही. शाळेतील दोन शिक्षिका भेटल्या. मात्र, कोणतेही रेकॉर्ड बघायला मिळाले नाही तसेच कुठलीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभागानं आता मोटी कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.