कसोटी गेली, किमान वन-डे तरी जिंका, आज विशाखा पट्टणमवर हिंदुस्थानची प्रतिष्ठेsची, अभिमानाची आणि बदल्याची लढाई
कसोटी गमावली, मालिका गमावली, सन्मान गमावला. आतां दैव वन–डे मालिका तरी जिंकून द्या, अशी विनवणी क्रिकेटप्रेमींनी हिंदुस्थानी संघाला केली आहे. उद्या तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे आणि दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहेत. दोघांसाठी जिंकू किंवा मरू असे असले तरी हिंदुस्थानी संघावर सर्वाधिक ताण आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत विराट कोहलीच्या बॅटने शतकी धमाका केला होता. आता शतकाची हॅटट्रिक ठोकावी, अशी सर्वांची अपेक्षा असली तरी दक्षिण आफ्रिकन संघालाही ठोकावे, अशीही मागणी आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत मिळालेल्या धक्क्याचे व्रण अजून ताजेच आहेत. आता त्या जखमेवर मलम लावण्याची हिंदुस्थानी संघाला संधी आहे. उद्याचा विजय हिंदुस्थानी संघाचे कसोटी अपयश धुऊन काढू शकतो. जिंकलो तर माफी, हरलो तर शिव्यांची लाखोली. हिंदुस्थानी संघाची अवस्था बिकट आहे. पण साऱया नजरा विराट आणि रोहितच्या कामगिरीकडे वळल्या आहेत.
पहिल्या सामन्यात 350 धावांचा डोंगर उभा करूनही सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला आणि साऱ्यांचे हृदयाचे ठोके चुकले. दुसऱ्या सामन्यात तर विराट, ऋतुराज आणि राहुल यांनी धावांचा पाऊस पाडला. पण गोलंदाजांनी त्या पाण्यात बुडून जायचाच हट्ट धरला! निकाल – 358 धावांचा एव्हरेस्ट उभारूनही हार. पहिल्या दोन सामन्यांचे एका शब्दांत विश्लेषण करायचे तर पहिला सामना नशिबाने जिंकलो तर दुसऱया सामन्यात पाहुणे यजमानांच्या थाटात जिंकले. आता तिसऱया सामन्यातही धावांचा पाऊस पडणार. फक्त हिंदुस्थानने टॉस जिंकावा आणि नंतर सामनाही जिंकावा. टॉस सध्या हिंदुस्थानसाठी ‘काळी जादू’ आहे. सलग 20 वेळा टॉस गमावणे म्हणजे योगायोग नाही, ती आता परंपराच झाली आहे. पुन्हा नाणेफेक हरलो तर मोठी धावसंख्या उभी करा आणि देवाला पह्न लावा, असाच फॉर्म्युला उद्याही वापरावा लागेल.
टॉस आपल्या बाजूने नसला तरी हिंदुस्थानच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. अपयशी फक्त गोलंदाज ठरले आहेत. कितीही मोठे लक्ष्य असले तरी गोलंदाज फलंदाजांवर मेहरबान होत आहेत. परिणामतः प्रतिष्ठsसाठी संघात काही बदल अपेक्षित आहेत आणि ते बदल गोलंदाजीतच असतात हे कुणालाही सांगावे लागणार नाही. प्रसिधने खूप धावा मोजल्या आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळेल आणि कोण बेंचवर बसेल हे संघव्यवस्थापनच सांगू शकते.
विराटची हॅटट्रिक?
विराट कोहली सध्या म्हणजे क्रिकेटचा ‘डॉन’. सलग दोन शतकांनंतरही तो शतकांचा भुकेला आहे. त्याची धावांची तहानही भागलेली नाही. भागणारही नाही. मागे त्याने 2018मध्ये विंडीजविरुद्ध सलग तीन शतके ठोकली होती. आताही त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे उद्या तिसरं शतक ठोकून तो हॅटट्रिक करतो का? आणि रोहित शर्माही तीन अंकी धावा करतो का? रोहितचीही फटकेबाजी क्रिकेटचाहत्यांन पाहायची आहे. गेले अनेक दिवस दोघांबद्दल वाचाळवीरांनी खूप थट्टा चालवलीय. उद्या दोघांचा पट्टा त्यांची बोलती कायमची बंद करील. 2027च्या वर्ल्ड कपचे तिकीट इथूनच पक्के करायचे आहे. त्यामुळे दोघे वाजणार नाहीत, गाजणार आहेत. गाजवणार आहेत.
आफ्रिकेला डबल धमाका करायचाय
कसोटीप्रमाणे वन-डेतही दक्षिण आफ्रिकेचा संघ वेगळाच भासतोय. पहिल्या कसोटीतील पहिला डाव सोडला तर पूर्ण मालिकेत आफ्रिकेचा संघ वरचढ ठरलाय. गेल्या दोन्ही सामन्यांत त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी हिंदुस्थानी संघापेक्षा किंचित सरस आहे. त्यामुळे कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही आपल्या खिशात घालत पाहुण्यांना डबल धमाका करायचाय. कर्णधार टेम्बा बवुमाचा आत्मविश्वास इतका दुणावलाय की, तो आता पाटा खेळपट्टीवर 350 काय 400 धावांचाही पाठलाग करू शकतो.
गोलंदाजीचं काय करायचं?
हिंदुस्थानच्या ताफ्यात असलेल्या गोलंदाजांचा दारुगोळा थंड पडलाय. त्यांच्यात आफ्रिकन फलंदाजांना रोखण्याची किंवा घाबरवण्याची क्षमताच नाही. त्यामुळे कुणाला काढावे आणि कुणाला घ्यावे, हा प्रश्न कायम आहे. कारण सगळेच एकाच माळेचे मणी आहेत. सारेच अननुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकण्याखेरीज काहीच उरलेले नाही.
Comments are closed.