तिशीनंतरच वजन झपाट्याने का वाढते? संशोधनातून समोर आली कारणं; जाणून घ्या उपाय
बऱ्याचदा तिशीनंतर वजनात झपाट्याने वाढ होते. जीवनशैलीत कोणताही बदल झाला नसला तरी वयाच्या ३० वर्षांनंतर वजन आपोआप वाढत जाते. त्यामागचं नेमकं कारण लक्षात येत नाही. पण तिशीनंतर वाढणाऱ्या वजनाबाबत एक संशोधन करण्यात आलं आहे. त्यात वजन वाढण्याची कारणं समोर आली आहेत. त्यानुसार, वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील नैसर्गिक बदल असू शकतं. तसेच तज्ञांच्या मते, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे, हालचाल न करणे आणि वाढलेल्या स्क्रीनटाइममुळे वजन वाढते. मग वजन नियंत्रित करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या…
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, ५० टक्के भारतीय त्यांच्या शारीरिक हालचालींचे लक्ष्य पूर्ण करत नाहीत. एका अहवालानुसार, अंदाजे ४० टक्के लोकांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो आणि खाण्याच्या सवयी देखील आरोग्यदायी नसतात. आजच्या घडीला निरोगी आहार हा ५५ टक्के भारतीयांच्या बजेटच्या बाहेर आहे. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या एका अभ्यासात भारतातील २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीनपैकी एका व्यक्तीला अतिरिक्त स्थूलता आहे, चारपैकी एका व्यक्तीला सामान्य स्थूलता आहे आणि पाचपैकी एका व्यक्तीला उच्च कोलेस्ट्रॉल आहे.
वजन कसे नियंत्रित ठेवावे?
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात प्रामुख्याने फळे आणि भाज्या, कडधान्य, डाळी, शेंगा, अंडी, दूध, दही, काजू यांचा समावेश असावा. हे पदार्थ उर्जेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचे जास्त प्रमाण असलेले पदार्थ खाणं टाळा. कारण त्यामुळं पोट लगेच भरतं पण वारंवार भूक लागते.
व्यायाम
आठवड्यातून दोन ते तीन दिवस हेव्ही वर्कआऊट केल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होऊ शकते. तसेच दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि मनही शांत राहतं.
हालचाली वाढवणे
दररोज ३० ते ४५ मिनिटे चालण्याचे ध्येय ठेवा. जर तुम्हाला जास्त वेळ बसावे लागत असेल, तर चालणं गरजेचं आहे. नियमित हालचाली केल्यास रक्तातील साखर आणि भूक नियंत्रणात राहते.
चांगली झोप घ्या
जर पुरेशी झोप घेतली नाही तर गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करण्याची इच्छा होते. त्यामुळं दररोज सात ते आठ तास झोपल्याने भूकेशी संबंधित हार्मोन्स नियंत्रित होण्यास मदत होते.
Comments are closed.