अकोले तालुक्यात बालविवाहाचे भीषण वास्तव, तीन मुली गर्भवती; दोघींनी दिला बाळाला जन्म

तालुक्यात बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि सामाजिक असुरक्षिततेचे गंभीर चित्र समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार तीन अल्पवयीन मुली गर्भवती असून, दोन कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील साकीरवाडी, पाचपट्टा, तिरडे आणि माळेगाव परिसरातील ही प्रकरणे असून, बालविवाह आणि लैंगिक अत्याचाराची वाढती उदाहरणे चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-2006नुसार मुलीचे 18 वर्षे व मुलाचे 21 वर्षांपूर्वी लग्न करणे गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.

ग्रामसेवक, बालविकास अधिकारी, ग्राम बालसंरक्षण समित्या नेमण्यात आल्या असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत ढिलाई दिसत असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

11 महिन्यांत ‘पोक्सो’चे 31 गुन्हे

n अकोले आणि राजूर पोलीस ठाण्यात गेल्या 11 महिन्यांत 31 ‘पोक्सो’ गुन्हे नोंद झाले आहेत. पीडित मुलींचे नियमित समुपदेशन आवश्यक असून, कमी वयात प्रसूती करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. तर, ग्रामीण भागातील अनेक घटना आरोग्य विभागापर्यंत पोहोचतच नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कुटुंबीयांचे मौन यामुळे प्रकरणे लपून राहतात. काही प्रकरणांत गुन्हा दाखल झालेला नाही.

बालविवाहामुळे मातामृत्यूदर वाढतो. बाळ कुपोषित जन्मते. हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गुपचूप होणारे विवाह हे याचे मुख्य कारण आहे. – हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते

Comments are closed.