विरार इमारत दुर्घटनेत 17 बळी, वसई पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना अटक

विरार येथील विजयनगरमधील अनधिकृत इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याप्रकरणी गुन्हे शाखेने वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली. ही इमारत कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली होती. इमारत धोकादायक असल्याचे माहीत असूनही गोन्साल्वीस यांनी ती रिकामी केली नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

विरार पूर्वच्या विजयनगर परिसरात असलेली रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत 26 ऑगस्ट 2025 रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. 50 सदनिका असलेली ही इमारत अवघ्या काही वर्षातच जीर्ण झाली होती. विकासकाने इमारतीच्या रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवासी कर भरत होते. या दुर्घनटेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल साने आणि जागामालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सहा आरोपींना अटक

दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखा युनिट 3 कडे सोपवला. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी विकासकासह पाच आरोपींना अटक केली असून त्यापैकी चार आरोपींना जामीन मिळाला आहे. विकासक नितल साने (48) अजूनही तुरुंगात आहे. या प्रकरणाची चौकशी करत असतानाच गुन्हे शाखा युनिट 3 ने आता पालिकेच्या प्रभाग (सी) चे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांच्यावर महिनाभरापूर्वी गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले आहे.

Comments are closed.