या खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये सांभाळावी टीम इंडियाची कमान! सौरव गांगुली यांचं वक्तव्य
भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय (ODI) आणि कसोटी (Test) संघाचे कर्णधारपद सध्या शुबमन गिलकडे (Shubman gill) आहे, तर टी-20 संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हाती सोपवण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून गिलच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी गिलला पाठिंबा दिला आहे. गांगुली यांचे म्हणणे आहे की, शुबमन गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये एकदिवसीय, कसोटी, टी-20 कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास पात्र खेळाडू आहे. गिल सध्या दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत नाही.
सौरव गांगुली यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले, मी एकदा ईडन गार्डन्सवर बसलो होतो, तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की, शुबमन गिलने टी-20 मध्ये कर्णधार म्हणून राहावे का? मी त्यांना सांगितले की, त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये कर्णधार व्हावे. मी त्यांना विचारले की, तीन महिन्यांपूर्वी हाच गिल इंग्लंडमध्ये होता आणि त्याने अप्रतिम फलंदाजी तसेच उत्तम नेतृत्व केले होते. त्याला इंग्लंडच्या भूमीवर लढण्यासाठी एक युवा टीम मिळाली होती, ज्यात कोहली-रोहित नव्हते आणि आता फक्त तीन महिन्यांत तुम्ही त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न विचारत आहात?’ लोकांची विचारसरणी अशी आहे.
सतत निर्णय घेणाऱ्या प्रत्येकासोबत हे घडते. तुमच्यात संयम हवा आणि कोणालाही उत्कृष्ट होण्यासाठी वेळ दिला पाहिजे. गिलचा इंग्लंडमधील पहिला टप्पा सोन्यासारखा होता. मात्र, एका टप्प्यानंतर तीच सिस्टीम आता त्याच्यात दोष शोधत आहे. गांगुली पुढे म्हणाले की, जर एखाद्या कर्णधाराचे मूल्यमापन केवळ तीन महिन्यांच्या चक्रात केले गेले, तर कोणताही कर्णधार या कामात प्रगती करू शकणार नाही.
शुबमन गिल आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत गिल फलंदाजी करताना दिसेल (T20 Series IND vs SA). पहिल्या टी-20 सामन्यापासूनच गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना गिलच्या मानेत ताण जाणवला होता, त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. याच दुखापतीमुळे गिल एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नाही.
Comments are closed.