IND vs SA: रोहित-विराट यांच्यासह यशस्वी जयस्वालची शानदार कामगिरी! टीम इंडियाने 2-1 ने मालिका जिंकली
यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात 9 गडी राखून सहज पराभूत केले. प्रोटियाज (दक्षिण आफ्रिका) संघाने दिलेले 271 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ एक विकेट गमावून सहज पूर्ण केले. रोहित शर्माने 73 चेंडूंत 75 धावा केल्या, तर यशस्वी जयस्वालने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
तसेच, विराट कोहलीनेही आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत नाबाद अर्धशतकी खेळी केली. गोलंदाजीत कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा दबदबा पाहायला मिळाला. या विजयासह भारतीय संघाने 2-1 ने वनडे मालिका आपल्या नावावर केली आहे.
271 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 25.5 षटकांत 155 धावांची मोठी भागीदारी केली. रोहित शर्माने 73 चेंडूंचा सामना करत 75 धावांची झटपट खेळी केली, ज्यात 7 चौकार आणि 3 मोठे षटकार होते. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर ‘करो या मरो’च्या या निर्णायक सामन्यात यशस्वी जयस्वालच्या बॅटने चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. यशस्वीने 121 चेंडूंत 116 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात 12 चौकार आणि 2 षटकार समाविष्ट होते.
यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आक्रमक फलंदाजी करत केवळ 45 चेंडूंमध्ये 65 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून परतला. कोहलीने 144 च्या स्ट्राइक रेटने खेळताना 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने रायन रिकेल्टनला शून्यावर बाद केले. यानंतर क्विंटन डिकॉक आणि कर्णधार टेंबा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. बावुमा 48 धावांवर बाद झाला. डिकॉकने एका बाजूने शानदार फलंदाजी करत 80 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याने 89 चेंडूंत 106 धावांची दमदार खेळी केली.
डिकॉक बाद झाल्यानंतर मात्र प्रोटियाज संघाची फलंदाजी गडगडली. प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी नियमित अंतराने विकेट्स घेतल्या, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 270 धावांवर ऑल आऊट झाला. कुलदीप यादवने 10 षटकांत 41 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णानेही 9.5 षटकांत 66 धावा देत चार विकेट्स आपल्या नावावर केल्या.
Comments are closed.