मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात सह दुय्यम निबंधक गजाआड, बावधन पोलिसांनी केली अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया पंपनीने खरेदी केलेल्या मुंढवा येथील 40 एकर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधकाला बावधन पोलिसांनी आज अटक केली. भोर येथील त्याच्या निवासस्थानावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शीतल तेजवानी यांना आधीच अटक झाली असून गुन्हा दाखल असलेले पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.
रवींद्र बाळकृष्ण तारू असे अटक केलेल्या दुय्यम निबंधकाचे नाव आहे. याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल किशनचंद तेजवानी, पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी पंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात 6 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20 मे 2025 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. 4 येथे हा व्यवहार झाला होता. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी परस्पर संगनमत करून मुंढवा येथील या जमिनीच्या सातबारा उतऱ्यावर भोगवटदाराचे नाव ‘मुंबई सरकार’ असल्याचे माहिती असतानाही व आवश्यक शासन परवानगी न घेता व्यवहार केला.
शासनाच्या नियमांनुसार या जमिनीचा खरेदी-विक्री दस्त करताना 5 कोटी 89 लाख 31 हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. तरीही आरोपींनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली. या प्रकरणात यापूर्वी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. आता सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला अटक झाली आहे. त्यामुळे या गुह्यात आरोपी असलेले दिग्विजय पाटील यांना कधीही अटक होऊ शकते.

Comments are closed.