Winter Session 2025 – निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या बहुमताच्या सरकारला नेमकी कसली भीती वाटते? आदित्य ठाकरे यांचा सवाल

नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने सत्तेत आलेले बहुमताचे सरकार नेमके कशाला घाबरत आहेत? विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी त्यांना कशाची भीती वाटते, असा सवाल त्यांनी केला. तसेच वृक्षतोड, इंडिगोचा गोंधळ यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आज सकाळपासून विरोधी पक्षनेत्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोध पक्षनेता कोणे होणार, कधी होणार? याबाबत चर्चा होत आहे. या सर्वात विरोधी पक्षनेता कधी होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रसारख्या राज्यात विरोधी पक्षनेता नाही, निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने बहुमताचे सरकार सत्तेत बसले आहे. हे बहुमताचे सरकार नेमके कशाला घाबरत आहे. दोन्ही सदनात विरोधी पक्षनेता नाही, तरीही सरकार घाबरत आहे. कदाचित सत्ताधारी पक्षातच दोन विरोधी पक्षनेते तयार होत आहेत, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. विरोधी पक्षनेत्याच्या प्रस्तावात कोणताही बदल झालेला नाही, याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ही बातमी कोणी, का, कशासाठी पेरली आहे, ते सर्व आम्हाला माहिती आहे. सत्ताधारी बाकावर एक पक्ष दोन गट आहेत. त्यातील एका गटातील 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले आहेत. ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. त्यामुळे यातून कोणी धसका घ्यायचा, हे ज्यांनी बातमी पेरली आहे, त्यांना समजेल, असेही ते म्हणाले. इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला, त्यांची थट्टा करण्यासाठी, जनतेचे लक्ष या प्रकरणापासून विचलीत करण्यासाठी किंवा भाजपच्या केंद्र सरकारला कोणी सवाल विचारू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली का, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक नेते चार्टर्ड प्लेनने आले. नगरपंचायती प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कोणत्या प्लेनने फिरले. एका उपमुख्यमंत्र्यांच्या गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत. मात्र, त्यांच्या गावात दोन हेलिकॉप्टर जातात. 2014 आधी देशात किती एअरलाइन्स होत्या. आता त्यात मोनोपॉली केली जात आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

तपोवन, ठाणे, नॅशनल पार्क, नागपूर अंजली वन याठिकाणी याचे वृक्षतोडीचे प्रयत्न सुरू आहे. विकासाचा नावाखाली विनाश करण्याचे सरकारचे धोरण आहे. या अशा निर्णयामुळे सरकार पर्यावरणाचा नाश करत आहे. तसेच जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यामुळे पर्यावरण वाचवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिवेशन सात दिवसांचे सांगितले जाते. मात्र, पाच दिवसातच काम उरकण्यात येते. मात्र, या काळात नेमकी कशावर चर्चा करण्यात येणार आहे. तपोवन, अजली वन आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर ते चर्चा करण्यात येणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात कोणत्याही निवडणुका समोर नसताना आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. मात्र, भाजपचे सरकार फक्त आश्वासने देत आहे. त्याची पूर्तता होत नाही, हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.