‘तुमची पत्नी हिंदुस्थानी नाही का?’ जेडी वान्स यांच्या स्थलांतर-विरोधी वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स (JD Vance) यांनी ‘मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर म्हणजे अमेरिकन ड्रिमची चोरी आहे’, असे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

वान्स यांनी ‘X’ वर लिहिले की, ‘मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर हे अमेरिकन ड्रिमची चोरी आहे. हे नेहमीच असे राहिले आहे’.

लुईझियाना येथील एका बांधकाम कंपनीच्या मालकाच्या व्हिडिओला प्रतिसाद म्हणून वान्स यांनी हे पोस्ट केले होते. त्या मालकाने दावा केला होता की, जेव्हापासून US Immigration and Customs Enforcement (ICE) ने राज्यात ऑपरेशन्स सुरू केली आहेत, तेव्हापासून खूप मोठा बदल झाला आहे. ते म्हणाले, ‘कोणत्याही स्थलांतरिताला कामावर जायचे नाही… आणि हे आश्चर्यकारक आहे. गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त कॉल मला गेल्या आठवड्यात आले आहेत’.

सोशल मीडियावर आक्रमक प्रतिक्रिया

वान्स यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले, अनेकांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष वेधले.

वान्स यांचा विवाह उषा वान्स यांच्याशी झाला आहे. उषा या हिंदुस्थानी वंशाच्या आहेत. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. तसेच उषा आणि जेडी वान्स या जोडप्याला दोन मुलगे (ईवान आणि विवेक) आणि एक मुलगी (मिरॅबेल) अशी तीन मुले आहेत.

एका युझरने लिहिले, ‘थांबा, तुमची पत्नी स्थलांतरित कुटुंबातून आलेली हिंदुस्थानी नाही का?’

दुसऱ्याने म्हटले, ‘याचा अर्थ तुम्हाला उषा, त्यांचे हिंदुस्थानी कुटुंब आणि तुमची मिश्र वंशाची मुले यांना पुन्हा हिंदुस्थानात पाठवावे लागेल. तुम्ही विमानाची तिकिटे कधी खरेदी करता ते आम्हाला सांगा. तुम्हाला उदाहरण घालून द्यावे लागेल.’

इतरांनी म्हणाले, ‘तुमची पत्नी आणि मुले अमेरिकन ड्रिमची चोरी करत आहेत.’

आणखी एका युझरने लिहिले, ‘तुमच्या पत्नीला, तिच्या कुटुंबाला आणि तुमच्या मुलांना संकटात न टाकता रिपब्लिकन उमेदवारी मिळवण्याचा मार्ग नक्कीच असेल.’

एका व्यक्तीने उपहासात्मक टिप्पणी केली, ‘मी सासऱ्यांचा द्वेष करणे समजू शकतो, पण हे जरा टोकाचे नाही का?’

वंश आणि शेजारी यावरून वाद

या गदारोळपूर्वी, वान्स यांनी केलेल्या एका विधानामुळेही वाद निर्माण झाला होता. वान्स म्हणाले होते की, अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या ‘वंश, भाषा किंवा रंग’ समान असलेल्या शेजाऱ्याला प्राधान्य देणे ‘संपूर्णपणे वाजवी आणि स्वीकारार्ह’ आहे.

वान्स यांचे विधान ‘अमेरिकेच्या नागरिकांनी त्यांच्या शेजाऱ्यांकडे पाहून, ‘मला अशा लोकांच्या बाजूला राहायचे आहे ज्यांच्यासोबत माझे काहीतरी साम्य आहे,’ असे म्हणणे पूर्णपणे वाजवी आणि स्वीकारार्ह आहे’, असे ते ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ पॉडकास्टमध्ये म्हणाले होते.

Comments are closed.