Ratnagiri News – उच्चशिक्षित मुलांनी वृद्ध आईला सोडले वाऱ्यावर, देखभालीकडे दुर्लक्ष; ग्रामस्थांची पोलिसात तक्रार

संगमेश्वर तालुक्यातील आमकरवाडी (गोळवली) येथील दत्तमंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध नागरिकांवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाबाबत संगमेश्वर पोलिसांकडे लिखित तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जानुसार रुक्मिणी विठोबा आमकर (वय अंदाजे ९० वर्षे) या वृद्धावस्थेमुळे तसेच आजारपणामुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहेत.
याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे की, रुक्मिणी आमकर यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणारे त्यांचा मुलगा महादेव विठोबा आमकर तसेच सुन त्यांच्याशी अत्यंत अमानुष वागणूक देत आहेत..वृद्ध मातेच्या जेवणापासून स्वच्छते पर्यंत कोणतीही काळजी घेतली जात नसून, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रुक्मिणी आमकर यांना अशा अवस्थेत एकट्याच घरात सोडून महादेव आमकर मुंबईला गेल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “या वृद्ध महिलांचे काही वाईट प्रसंग घडल्यास कोण जबाबदार?” असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम २००७ तसेच भा.दं.सं. कलम १५१ अंतर्गत संबंधित मुलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंचक्रोशीतील इतर वयोवृद्ध पालकांसाठीही हा दिशादर्शक ठरावा, अशी अपेक्षा तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुक्मिणी आमकर यांना संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अर्जामध्ये नमूद केली आहे.संगमेश्वर पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.