आयसीसीने टीम इंडियाला सुनावली कडक शिक्षा, वनडे मालिकेतील 'या' चुकीमुळे ठोठावला मोठा दंड!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच संपन्न झाली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टीम इंडियाला मालिकेदरम्यान एका सामन्यात धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल कठोर शिक्षा ठोठावली आहे. टीम इंडियाची 10% मॅच फी कापण्यात आली आहे. यादरम्यान कर्णधार केएल राहुलने आपली चूक आणि संघावर लागलेला हा मोठा दंड स्वीकारला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (3 डिसेंबर 2025) रोजी रायपूर येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने धीम्या गतीने षटके टाकली. याच कारणामुळे त्यांच्यावर मॅच फीच्या 10% दंड लावण्यात आला आहे. आयसीसी (ICC) एलिट पॅनेलचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी टीम इंडियावर हा मोठा दंड ठोठावला, कारण केएल राहुलच्या संघाने निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकली. टीम इंडियाने आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल 2.22 चे उल्लंघन केले आहे. या नियमानुसार, जर कोणताही संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करत नसेल, तर प्रत्येक कमी टाकलेल्या षटकासाठी त्या संघाला 5% दंड भरावा लागतो.
टीम इंडिया दोन षटके कमी टाकल्यामुळे त्यांची 10% मॅच फी कापण्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने आपली चूक स्वीकारली असून दंड भरण्यास तो तयार झाला आहे. नेहमीप्रमाणे, टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटसाठी दंड लागत नाही, कारण त्यांच्याकडून सहसा अशी चूक होत नाही. तथापि, कधीकधी षटकांच्या गणनेत झालेल्या चुकीमुळे संघाला मोठे नुकसान सहन करावे लागते.
कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर, टीम इंडिया वनडे मालिकेत विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेकडून बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरली होती. असे म्हणता येईल की, ते बदला घेण्यात यशस्वी झाले. रांची येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला. रायपूर येथे झालेला दुसरा वनडे सामना मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला, जिथे त्यांनी 359 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग 4 विकेट्स राखून यशस्वीपणे केला. विशाखापट्टणम येथे टीम इंडियाने तिसरा वनडे सामना 9 विकेट्सने जिंकला आणि मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली.
Comments are closed.