इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा राज्यातील शेतकऱ्यांनाही फटका; स्ट्रॉबेरी, भाज्या आणि फुलांचे नुकसान

इंडिगोच्या सततच्या फ्लाइट रद्द आणि विलंबामुळे विमानवाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाचा मोठा फटका शेतीमाल आणि हवाई मालवाहतूक व्यवसायाला बसला आहे. महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी गोळा करून देशभरातील बाजारपेठांमध्ये पुरवठा करणारे अनिल येवले यांनी गेल्या पाच दिवसांत अनेक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार येवले रोज सुमारे 45 शेतकऱ्यांकडून अंदाजे 2.5 टन स्ट्रॉबेरी घेतात आणि कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये हवाई मार्गाने पाठवतात. सामान्यतः ते रोज 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल करतात, मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पुणे विमानतळावरून त्याची एकही स्ट्रॉबेरीची खेप उड्डाण करू शकलेली नाही. “स्ट्रॉबेरी रात्री विमानतळावर पोहोचली की दुसऱ्या दिवशी बाजारात पोहोचणे आवश्यक असते, नाहीतर मालाची नासाडी होते. फळांसाठी कोणतेही विमा संरक्षण नसल्याने संपूर्ण तोटा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाच सहन करावा लागतो,” असे त्यांनी सांगितले.

पुणे विमानतळाचे संयुक्त महाव्यवस्थापक (कार्गो) प्रदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, इंडिगो संकटानंतर कार्गो वाहतूक सुमारे 55टक्के ठप्प झाल्यामुळे आहे. “साधारणपणे पुण्यातून दररोज 180 ते 190 मेट्रिक टन माल ये-जा करतो. गेल्या तीन-चार दिवसांत ही संख्या 90 मेट्रिक टनांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय कार्गोवर फारसा परिणाम झालेला नाही, कारण येथे आंतरराष्ट्रीय उड्डाणे मर्यादित आहेत,” असे ते म्हणाले.

मावळ परिसरातून रोज गुलाबाची फुले विविध शहरांकडे पाठवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. India Society of Floriculture Professionals चे अध्यक्ष प्रवीण शर्मा म्हणाले, “पुणे हे उच्च मूल्य असलेल्या कट-फ्लॉवर उत्पादनासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. हवाई कार्गो अडकल्यामुळे सुमारे 10टक्के नुकसान झाले असून फुलांची गुणवत्ता घसरली आहे.” लग्नसराईमुळे गुलाबासह फुलांच्या मागणीत आणि किंमतीत वाढ झाली आहे. एका बुकेची किंमत 200–250 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत गेली असली तरी कोलकाता, गुवाहाटी, रांची, जयपूर यांसारख्या दूरच्या बाजारपेठांमधून येणाऱ्या ऑर्डर्समध्ये सुमारे 20टक्के घट झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना बस किंवा रेल्वेमार्गे माल पाठवण्याचा पर्याय वापरावा लागत आहे; मात्र जास्त प्रवासवेळेमुळे फुलांची आणि भाज्यांची गुणवत्ता खराब होते.

भाजीपाला आणि भाज्यांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. श्रीनाथ अॅग्रोचे रवींद्र वाघ म्हणाले, “आईसबर्ग, सेलरी, पार्सली, ब्रोकोली, चेरी टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा मोठा भाग पुण्यावरून हवाई कार्गोने देशभर पाठवला जातो. फ्लाइटच्या गोंधळामुळे ऑर्डर्स कमी झाल्या आहेत आणि संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. काही वेळा शेवटच्या क्षणी फ्लाइट रद्द झाल्याने माल उतरवून दुसऱ्या फ्लाइटवर चढवावा लागला. एका पाठवणीला पुणे ते बेंगळुरू हा प्रवास पूर्ण करायला तब्बल 48 तास लागले.”

एसबी लॉजिस्टिक्सचे मालक संदीप भोसले यांनी सांगितले की, केवळ शेतीमालच नव्हे तर ऑटोमोबाईल पार्ट्स आणि लसींच्या पाठवणीवरही परिणाम झाला आहे. “पुणे हे पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे कार्गो केंद्र आहे. अनेक ग्राहकांना शिपमेंट रद्द करावी लागली किंवा माल परत घेऊन पर्यायी मार्ग शोधावे लागले,” असे ते म्हणाले.

Comments are closed.