Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटतेय, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधीलच सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळेच सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही असं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीका केली. कोकणात ठाकरेंची शिवसेनाच चालेल, आदित्य ठाकरेंसाठी (Aaditya Thackeray) विरोधी पक्षनेतेपदाचा एका क्षणात त्याग करेन असंही भास्कर जाधव म्हणाले. एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव या नावाचे पत्र देण्यात आल्याचं आदित्य ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं. तरीही सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन असं भास्कर जाधव म्हणाले.

Bhaskar Jadhav On Opposition Leader : सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती
सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती असल्याचं सांगत भास्कर जाधव म्हणाले की, “दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिलं जातं. जेव्हा पक्षाच्या गटनेतेपदी माझी निवड झाली तेव्हा हे शक्य आहे असं मला वाटलं. मी सचिवांना पत्र लिहलं. विरोधी पक्ष नेतेपद निवडीसंदर्भात कायद्यात तरतूद काय याची माहिती लिखित द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी अशी 10 टक्के सदस्यसंख्येची अट नाही, अशी माहिती सचिवालयाने दिली.”

या सरकारमधील भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर येत आहेत ते हिमनगाचे एक टोक आहे. हे लोक एकमेकांचे पाय ओढत आहेत. विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली तर सरकारमधील लोक विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना भीती आहे असं भास्कर जाधव म्हणाले.

Comments are closed.