IND vs SA: अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? संजू सॅमसन की शुबमन गिल? कर्णधार सूर्यकुमार यादवने दिले उत्तर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कटक टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत (Pre-Match Press Conference) अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शुबमन गिल आणि संजू सॅमसनपैकी सलामी फलंदाज (ओपनर) कोण असेल, यावर मोठी चर्चा सुरू होती, ज्यावर कर्णधार सूर्याने आता विराम दिला आहे. याशिवाय, त्याने प्लेइंग इलेव्हनबद्दलही मोठा संकेत दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी20 मालिकेनेच टीम इंडियाने त्यांच्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीला गती दिली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत अनेक बदल केले आहेत, पण या मालिकेपासून ते बदल थांबण्याची शक्यता आहे. याच प्रश्नाला उत्तर देताना कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत म्हणाला, आम्हाला कॉम्बिनेशनच्या बाबतीत फार जास्त बदल करायचे नाहीत. आम्ही कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळू इच्छितो, यावर आमचे लक्ष आहे. याव्यतिरिक्त, आम्हाला मोठा कोणताही बदल करायचा नाही.

संजू सॅमसनबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, संजू असा फलंदाज आहे जो वरच्या क्रमाने खेळू शकतो. त्याने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. शुबमन संजूच्या आधी खेळला, कारण तो त्या जागेसाठी पात्र होता, पण तरीही संजूला संधी मिळतील याची आम्ही खात्री केली आहे.

फलंदाजी क्रमातील सततच्या बदलांबद्दल प्रश्न विचारला असता कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला,
सलामीच्या फलंदाजांशिवाय (Openers), बाकीच्या सर्वांना लवचिक (Flexible) राहावे लागेल. त्यांना जुळवून घ्यावे लागेल. ते दोघे (गिल आणि संजू) आमच्या प्लॅनमध्ये आहेत, दोघेही अनेक भूमिका निभावू शकतात. ही टीमसाठी एक चांगली गोष्ट आहे आणि एक चांगली डोकेदुखी (Good Headache) देखील आहे. वर्ल्ड कपपूर्वी आम्हाला दोन चांगल्या टीम्सविरुद्ध 10 टी20 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे सध्या आमचं लक्ष त्या सामन्यांवर आहे. जसा आपण स्पर्धेच्या जवळ जाऊ, तसतसं आम्ही हळूहळू आमचं पूर्ण लक्ष टी20 वर्ल्ड कपवर केंद्रित करू.

Comments are closed.