काश्मीरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी
आत्मघाती बॉम्बरच होता धोकादायक कट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत लाल किल्ल्यानजकी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटावरून मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीला हादरविण्यापूर्वी आत्मघाती बॉम्बर डॉक्टर उमर उन नबीने काश्मीरच्या जंगलांमध्ये विस्फोटकांचे परीक्षण केले होते. त्यानंतरच त्याने दिल्लीत स्फोट घडविला होता असे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. दिल्लीतील स्फोटात 15 जणांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. एनआयएने याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मट्टन वनक्षेत्रात शोधमोहीम राबविली आहे.
दहशतवादी स्फोटाचा मुख्य आरोपी सुसाइड बॉम्बर उमर नबीने मट्टन वनक्षेत्रातच स्फोटकांचे परीक्षण केले होते. हे परीक्षण दिल्लीत स्फोट घडवून आणण्याच्या तयारीच्या अंतर्गत करण्यात आले होते.
एनआयएच्या शोधमोहिमेला जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफची साथ मिळाली. यादरम्यान एनआयएने या प्रकरणातील आरोपी डॉ. अदील राथर आणि जसीर बिलाल वानी यांना स्फोटकांच्या परीक्षणस्थळी आणले हेते. दोन्ही आरोपींनी वनक्षेत्रातील या ठिकाणाविषयी चौकशीदरम्यान खुलासा केला होता.
शोधमोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी एक सिलिंडर हस्तगत केला आहे. या सिलिंडरचा स्फोटकांच्या परीक्षणादरम्यान वापर करण्यात आला असावा असे मानले जातेय. या वनक्षेत्रात अद्याप शोध घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचे केंद्र म्हणून आतापर्यंत दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाचे नाव समोर आले आहे. दिल्ली स्फोटाशी निगडित अनेक आरोपी या विद्यापीठाशी संबंधित असून यातील बहुतेक जण पेशाने डॉक्टर आहेत. यात आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर उन नबीही सामील होता.
Comments are closed.