सोनिया गांधींना न्यायालयाची नोटीस

मतदार यादी वादाचे प्रकरण : नागरिकत्वाशिवाय मतदान होण्याचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना मतदारयादी प्रकरणी नोटीस जारी केली आहे. सोनिया गांधी या भारताच्या नागरिकत्व मिळण्यापूर्वीच मतदार झाल्या होत्या, असा आरोप आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू सत्र न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सोनिया गांधींच्या विरोधात एफआयआर नोंद करण्याची मागणी फेटाळणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

सोनिया गांधींनी 1980 मध्येच कथित स्वरुपात स्वत:चे नाव मतदारयादीत सामील करविले होते असा आरोप आहे. ही याचिका अधिवक्ता विकास त्रिपाठी यांनी दाखल केली असून ते राउज अॅव्हेन्यू कोर्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत.

न्यायालयाने राज्यसभा खासदार सोनिया गांधींच्या विरोधात गुन्हा नोंद करविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सोनिया गांधी अणि दिल्ली पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे.

1980 च्या मतदारयादीत सोनिया गांधींचे नाव सामील होते, तर त्यांना भारतीय नागरिकत्व अधिकृत स्वरुपात 30 एप्रिल 1983 रोजी मिळाले होते असा दावा करण्यात येत आहे. भारतीय नागरिक नसतानाही 1980 च्या मतदारयादीत त्यांचे नाव कशाप्रकारे सामील करण्यात आले असा प्रश्न याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. 1982 मध्ये सोनिया गांधींचे नाव मतदारयादीतून हटविण्यात आले होते असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

1980 मध्ये सोनिया गांधींचे नाव मतदारयादीत सामील करण्यासाठी कोणते दस्ताऐवज सादर करण्यात आले होते आणि याकरता बनावट दस्तऐवजांचा वापर करण्यात आला होता का असे प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केले आहेत.

 

Comments are closed.