अहिल्यानगर जैन मंदिर भूखंड प्रकरण, आमदार जगताप यांची माघार; तीन महिन्यांत जागा परत करणार
‘माता मंगूबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेली जागा आम्ही तीन महिन्यांच्या आत समाजाला हस्तांतरित करू, असे वचन आमदार संग्राम जगताप यांनी दिले आहे,’ असे जैन समाजाचे क्रांतिकारी राष्ट्रसंत आचार्य गुप्तिनंदीजी यांनी सांगितले. ‘आज सकाळी आमची भेट झाली तेव्हा ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा, गणेश गोंडाळ हेही उपस्थित होते,’ असेही आचार्य म्हणाले.
जैन समाजाचे राष्ट्रसंत आचार्य गुप्तिनंदीजी यांचे आज अहिल्यानगर शहरात आगमन झाले. यावेळी जैन समाजाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर आनंदधाम येथील जाहीर प्रवचनात त्यांनी ही माहिती समाजाला दिली. यावेळी आचार्य भगवंत श्री महाबोधी सुरीश्वरजी महाराज, कुंदनऋषीजी महाराज, अलोकऋषीजी महाराज यांचेदेखील प्रवचन पार पडले.
आचार्य गुप्तिनंदीजी म्हणाले, ‘एचएनडी प्रकरणात पंधरा बुलडोझर, दोनशेपेक्षा जास्त पोलीस ‘एचएनडी’ तोडण्याच्या तयारीत होते. पण माझ्या जिवंतपणी मी बुलडोझर चालू देणार नाही, असा इशारा त्यांना दिला. सुरुवातीला याप्रकरणी पोलीस तक्रार घेत नव्हते. कोणी नेता ऐकायला तयार नव्हता. मात्र, त्याबाबत सकल जैन समाज एकत्र झाला, मोर्चे निघाले आणि अखेर आपला विजय झाला.’
‘अहिल्यानगरच्या भूखंड प्रकरणासाठी ज्यांनी संघर्ष केला, आवाज उठवला, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा केला, त्यांना मी आशीर्वाद देतो. आमदार जगताप, गोंडाळ यांनादेखील आशीर्वाद देतो. मी सर्वांना क्षमा करतो,’ असे सांगत, ‘धर्मांच्या जागांवर कुणी कब्जा करून मोठा होऊ शकत नाही. कारण तिथल्या शक्ती तुम्हाला कधीही सफल होऊ देणार नाहीत,’ असे त्यांनी सांगितले.
शिवसेना महानगरप्रमुख किरण काळे यांच्या आंदोलनाला यश
– आमदार जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करून त्यावर आपले राजकीय कार्यालय थाटल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किरण काळे, मनोज गुंदेचा, विकेश गुंदेचा यांच्यासह शिवसैनिकांनी पुण्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. तसेच आचार्य गुप्तिनंदीजी यांची पुण्यात भेट घेत याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती काळे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जगताप यांना याप्रकरणी समाजाशी न्याय करण्याचे आवाहन केले होते. अन्यथा अहिल्यानगरमध्ये उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता आमदार जगताप यांनी जागा परत करण्याचे वचन दिले, हा शिवसेनेचा विजय असल्याचे मानले जात आहे.
Comments are closed.