'जस्सी सारखं कुणी नाही…' बुमराहने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक पूर्ण करून रचला इतिहास!

भारत-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 101 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला आणि जसप्रीत बुमराहने 2 महत्त्वाचे बळी घेतले. टीम इंडियाच्या विजयात त्याची भूमिका महत्त्वाची होती. याचबरोबर तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा खेळाडू ठरला आहे. या अनोख्या शतकामुळे चाहते ‘जस्सी सारखं कुणी नाही’ असे म्हणायला लागले आहेत.

जसप्रीत बुमराहने यापूर्वीच कसोटी (Test) आणि एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये 100 हून अधिक बळी (विकेट्स) घेतले होते. टी20 मध्ये त्याच्या नावावर 99 बळी होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कटक येथे त्याला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. त्याने या संधीचा फायदा घेतला आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना बाद करून इतिहास घडवला. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 100 हून अधिक बळी घेतले आणि तो अर्शदीप सिंहनंतर असा विक्रम करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यांमध्ये 100 बळी घेताच, जसप्रीत बुमराहने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. तो असा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे, ज्याने कसोटी (Test), एकदिवसीय (ODI) आणि टी20 आंतरराष्ट्रीय (T20I) या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने मिळवलेल्या 101धावांच्या विजयात जसप्रीत बुमराहची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्याने सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात धोकादायक फलंदाज असलेल्या डेवाल्ड ब्रेविसचा (Dewald Brevis) बळी घेतला. डावाच्या सातव्या षटकात (ओवरमध्ये) बुमराहच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रेविसने सूर्यकुमार यादवकडे झेल दिला. याशिवाय बुमराहने केशव महाराजचा बळी देखील घेतला. आशा आहे की टी20 मालिकेतील पुढील 4 सामन्यांमध्येही जस्सी (बुमराह) याच पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी करत राहील.

Comments are closed.