हा संविधानाचा दुरुपयोग आहे.
द्रमुकवर पवन कल्याण यांची घणाघाती टीका
वृत्तसंस्था / विजयवाडा
तामिळनाडूमध्ये एका प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हिंदू भाविकांच्या अधिकारांच्या बाजूने निर्णय दिला म्हणून या न्यायाधीशावर संसदेत महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव देणे, हा उघडपणे घटनाद्रोह आहे, अशी घणाघाती टीका आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली आहे. तामिळनाडूच्या द्रमुक पक्षाच्या खासदारांनी या न्यायाधीशाविरोधात महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव दिला असून या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाने कडाडून विरोध केला आहे.
द्रमुक संसद सदस्यांनी बुधवारी राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. तथापि, हा प्रस्ताव स्वीकारला जाण्याची शक्यता कमी आहे. प्रस्ताव स्वीकारला जाऊन तो दोन तृतियांश बहुमताने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झाल्यास या न्यायाधीशा त्यागपत्र द्यावे लागणार आहे.
प्रकरण काय आहे…
तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात असणाऱ्या ‘थिरुपरणकुंडरम्’ या टेकडीवर हिंदूंचे महत्वाचे देवस्थान आहे. हे देवस्थान सुब्रम्हणियम स्वामी या देवतेचे आहे. ही देवता तामिळनाडूतील भगवान मुरुगम यांचा सहावा अवतार म्हणून परिचित आहे. तसेच या टेकडीवर प्राचीन जैन गुहा आहेत. तसेच 14 व्या शतकातील एक दर्गाही आहे. या हिंदू मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी ‘दीपमाळे’वर पवित्र दीपाचे प्रज्वलन केले जाते. या धार्मिक कार्यक्रमासाठी लक्षावधी हिंदू भाविक तामिळनाडू आणि आसपासच्या राज्यांमधून येत असतात. यावेळी तामिळनाडू सरकारने हा दीपप्रज्वलन कार्यक्रम या दीपमाळेवर करु नये असा आदेश काढला होता. या मंदिरानजीक दर्गा असल्याने मुस्लीमांच्या भावना दुखावतील असे कारण या आदेशासाठी देण्यात आले होते. त्याविरोधात हिंदू संघटनांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय न्यायाधीशांनी या याचिकेवर हिंदू भाविकांच्या बाजूने निर्णय दिला. दीपप्रज्वलनाचा पांरपरिक कार्यक्रम केल्याने कोणाच्याही भावना दुखाविण्याचे काहीही कारण नाही, असे या न्यायाधीशांनी स्पष्ट केले. हा निर्णय असूनही तामिळनाडू सरकारने या निर्णयाच्या विरोधात जाऊन हा कार्यक्रम होऊ दिला नाही. त्यामुळे तामिळनाडूत हिंदू भाविकांमध्ये संतप्त भावना आहे. आता तेथील द्रमुक सरकारने उच्च न्यायाललयाच्या या न्यायाधीशांच्या विरोधातच महाभियोग प्रस्ताव मांडला आहे.
पवन कल्याण यांचा आरोप
न्यायाधीशांनी हिंदूंच्या बाजूने कायदेशीर निर्णय दिला म्हणून तामिळनाडूचे सरकार या न्ययाधीशांना आणि एकंदरच न्यायव्यवस्थेला घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे. घटनेचा हा दुरुपयोग आहे. घटनेने राजकीय पक्षांना दिलेले अधिकार घटनेच्याच विरोधात शस्त्र म्हणून उपयोगात आणले जात आहेत. आमच्या विरोधात निर्णय द्याल तर तुम्हाला पदावरुन काढले जाईल, अशी धमकी न्यायाधीशांना देण्याचा हा प्रकार आहे, अशी कठोर टीका पवन कल्याण यांनी केली आहे.
सनातन धर्माचा हा अपमान
सनातन धर्माचा अपमान करणे ही आज बनावट धर्मनिरपेक्ष नेत्यांची फॅशन बनली आहे. बनावाट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सनातन धर्माला दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तामिळनाडूच्या द्रमुक खासदारांनी न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव देणे, हा सनातन धर्माची गळचेपी करण्याचाच प्रयत्न असून या विरोधात साऱ्यांनी आवाज उठविण्याची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन पवन कल्याण यांनी बुधवारी केले. या एकंदर प्रकारामुळे तामिळनाडूत वातावरण तापले असून हिंदू संघटनांनी तामिळनाडू सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यभर निदर्शने करण्यास प्रारंभ केला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू परंपरा नष्ट करण्यात येत असल्याची टीका भारतीय जनता पक्षानेही केली आहे.
Comments are closed.