एसआयपीचा शेअर बाजाराला आधार, नोव्हेंबरमध्ये SIP तून 29445 कोटी रुपयांची गुंतवणूक, आकडेवारी समोर

म्युच्युअल फंड SIP: भारतीय शेअर बाजाराला देशांतर्गत रिटेल गुंतवणूकदारांकडून मोठा आधार मिळतोय. मुच्युअल फंडमध्ये सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय लोकप्रिय झाला आहे. भारतात अर्थसाक्षरतेचं प्रमाण ज्या प्रकारे वाढतंय त्यानुसार एसआयपीवरील रिटेल गुंतवणूकदाराांचा विश्वास वाढत चालला आहे. नोव्हेंबर  2025 मध्ये म्युच्युअल फंडमध्ये 29445 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली. ऑक्टोबर महिन्यात 29529 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे आली होती.

नोव्हेंबर महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये 29445 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये  गुंतवणूक कमी झाली असली तर वार्षिक आधारावर 21.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे प्रमुख  वेंकट चलसानी यांच्या मते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वीकेंड असल्यानं गुंतवणूक डिसेंबर महिन्यात गेली.

नोव्हेंबर महिन्यात 57.14 लाख नव्या एसआयपी सुरु झाल्या. तर, 43.19 लाख एसआयपी कालावधी पूर्ण झाल्यानं बंद झाल्या. यानुसार स्टॉपेज गुणोत्तर 75.66 टक्के राहिलं. नोव्हेंबरमधील सक्रीय एसआयपी खात्यांची संख्या 9 कोटी 43 लाख झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सक्रीय एसआयपी खाती कमी झाली आहेत. एसआयपीद्वारे असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 16.53 लाख कोटी रुपये झाली.

एसआयपीमधील गुंतवणूक का फायदेशीर?

बीपीएन फिनकॅपचे संचालक ए. के. निगम यांच्या मते एसआयपीची वाढती लोकप्रियता आर्थिक साक्षरता, सोपी फिनटेक एप्स, बाजाराची मजबुती, शिस्तबद्ध गुंतवणूक, कम्पाऊंडिंग आणि गुंतवणुकीतील लवचिकता यामुळं वाढली आहे.

सोशल मीडिया, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक आणि ट्रेडिंगची माहिती वाढल्यानं लोक एसआयपी रत आहेत. AMFI सारख्या संस्था, वित्तीय संस्था आणि इतर संघटनांच्या अभियानामुळं युवा गुंतवणूकदार, छोट्या शहरातील गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढली आहे. विविध अॅप्स उपलब्ध झाल्यानं गुंतवणूक प्रक्रिया सोपी झाली आहे. भारतीय शेअर बाजार मजबूत झाल्यानं गुंतवणूकदारांचा विश्वास देखील वाढला आहे. एसआयपीमुळं गुंतवणूकदारांना नियमित गुंतवणूक करण्याची सवय लागते. ज्यामुळं बाजारातील तेजी आणि घसरणीचा परिणाम कमी होतो. एसआयपीद्वारे केलेल्या गुतंवणुकीत व्याजावर व्याज मिळतं. आर्थिक जाणकारांच्या मते एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक होत असल्यानं आर्थिक साक्षरता वाढल्याचं पाहायला मिळतं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.