उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर झाला.
बहिणीच्या विवाहामुळे 16 ते 29 डिसेंबरपर्यंत दिलासा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2020 च्या दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला गुरुवारी दिल्ली न्यायालयाने 14 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. उमरला त्याच्या बहिणीच्या विवाहासाठी हा दिलासा देण्यात आला. दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने त्याला 16 ते 29 डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला असून या काळात तो आपल्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहील. जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद दिल्ली दंगली भडकवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 2020 पासून तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 ते 29 डिसेंबरपर्यंत खालिदला अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार जामिनाच्या कालावधीत तो सोशल मीडियाचा वापर करणार नाही. तसेच फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकणार आहे. 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या दोन जामीनदारांवर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या त्याला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या प्रकरणात त्याला अद्याप नियमित जामीन मिळालेला नाही. यापूर्वी उमर खालिदला डिसेंबर 2024 मध्ये त्याच्या चुलत भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सात दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.
Comments are closed.