इंडिगोच्या अध्यक्षांची माफी
प्रवाशांना जाणूनबुजून त्रास न दिल्याची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
इंडिगो एअरलाइनचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी विमानो•ाणे रद्द केल्याबद्दल प्रवाशांची जाहीर माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या इंडिगो संकटामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माफी मागितली आहे. नवीन नियमांना बगल देण्यासाठी एअरलाइनने जाणूनबुजून हे संकट निर्माण केल्याच्या आरोपांचाही त्यांनी स्पष्टपणे इन्कार केला. यापूर्वी, इंडिगोच्या सीईओंनीही या संकटाबद्दल माफी मागितली होती.
इंडिगोच्या अध्यक्षांनी आपल्या आठ मिनिटांच्या व्हिडिओ संदेशात 3 डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात उ•ाणे रद्द झाल्याची कबुली दिली. कंपनीने आपल्या ग्राहकांना निराश केले असल्याचे ते म्हणाले. मात्र, याबद्दल दिलगिरी व्यक्त करत एअरलाइनच्या सेवा तुलनेने लवकर सामान्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना पुन्हा अशापद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी व्यवस्थापन योग्य निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोंधळाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी हे व्यत्यय जाणूनबुजून घडवल्याचे दावे फेटाळून लावले. आम्ही सरकारी नियमांना टाळण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही सुरक्षिततेशी तडजोड केली असे दावे निराधार आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आम्ही अद्ययावत नियमांनुसार काम केले आणि त्यांना टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असे ते म्हणाले.
इंडिगो सीईओंना ‘हाजीर हो’ आदेश
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) देशभरातील हजारो प्रवाशांना प्रभावित करणाऱ्या घटनांच्या संपूर्ण साखळीची चौकशी करत आहे. याचदरम्यान डीजीसीएने इंडिगो एअरलाइनच्या सीईओंना चौकशीसाठी पाचारण केले आहे. डीजीसीएने त्यांना नोटीस पाठवली असून शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. इंडिगोशी संबंधित संपूर्ण संकटाची मूळ कारणे तपासण्यासाठी आणि भविष्यात अशा समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी डीजीसीएकडून काळजी घेतली जात आहे.
Comments are closed.