इमारतींच्या ओसीसाठी सुधारित अभय योजना लागू; वीस हजार इमारतींना फायदा

गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (‘ओसी’) अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱया मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे 20 हजार इमारतींना नियमित करण्यासाठी ‘सुधारीत भोगवटा अभय योजना’ लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याचा फायदा दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल. मुंबईत जवळपास 20 हजार इमारती आहेत ज्यांच्या मूळ मंजूर आराखडय़ात किरकोळ बदल केल्यामुळे त्यांना ओसी मिळू शकलेली नाही. ओसी नसल्याने या इमारतींमधील रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर भरावा लागतो. या योजनेमुळे सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना आणि 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना थेट फायदा होईल. या योजनेमुळे मुंबईकरांना ओसी नसल्यामुळे भरावा लागणारा दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही. घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होईल. त्याचबरोबर महापालिकेच्या कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आता दूर होईल.

Comments are closed.