खंदक तपासा…. येवा आमचा! पुण्यातील अनुभवाचे स्पेशलायझेशन पुण्यात

सिंधुदुर्गातील अश्मयुगीन कातळशिल्पे पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक हमखास कोकणात येतात, परंतु पुण्यातील 80 वर्षांहून अधिक वय असलेल्या पाच ते सहा उत्साही मंडळींनी कोकणात येऊन कातळशिल्पाचा अनुभव घेतला. ही मंडळी फक्त वयाने 80 वर्षांची होती, परंतु त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असा होता, असे सिंधुदुर्ग जिह्यातील कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी सांगितले.

कातळशिल्पे पाहायची असतील तर मार्गदर्शकाशिवाय ती पाहता येत नाहीत आणि कळतही नाहीत. सध्या डिसेंबरचा महिना असल्याने कोकणात सकाळी कडाक्याची थंडी, तर दुपारी कडक ऊन असे चित्र आहे. कातळशिल्पे पाहण्यासाठी पुण्याहून सुधीर भिडे, अनिल चौधरी, श्रीकृष्ण सुमंत, विजय धडफळे, कर्नल संजीव पटवर्धन आले होते. या सर्वांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण सकाळी सातलाच निघालो. या वयातही सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता. त्यांची कातळशिल्पे जाणून घेण्याची जिज्ञासा स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. रस्त्यांवरून जाताना त्यांच्या मनातील कुतूहल आणि ओबडधोबड रस्त्याची पर्वा न करता पायी चालून आम्ही कुडोपी या ठिकाणी पोहोचलो. या सर्वांनी या ऐतिहासिक स्थळाचे खास क्षण अनुभवले. मनात येतील ते प्रश्न विचारले. तसेच कातळशिल्पांचे बारकावे जाणून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला मालवणचा सिंधुदुर्ग किल्लाही बघितला, असे सतीश लळीत यांनी सांगितले.

कातळशिल्पे म्हणजे काय?

कातळ म्हणजे कठोर, दगड किंवा खडकाळ जमीन. जुन्या काळात दगड किंवा खडकावर केलेल्या कोरीव कामाला कातळशिल्प म्हटले जाते. आदिमानवाने दगडात विविध शिल्पे कोरून ठेवलेली आढळतात. त्यालाच कातळशिल्पे म्हणतात. मालवण तालुक्यातील कुडोपी गावाजवळ असलेली कातळशिल्पे प्रसिद्ध आहेत.

हे तर माझे कामच!

‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या माझ्या पुस्तकामुळे अनेक जण सिंधुदुर्गात येतात. बरेच जण थेट माझ्याशी संपर्क करतात. कोकणात आल्यानंतर त्यांना कातळशिल्पे दाखवणे हे माझे काम आहे. कातळशिल्पे पाहायची असतील तर येवा कोकण आपलोच आसा… असे सतीश लळीत यांनी म्हटले.

स्वच्छता मोहीम

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त घुंगुरकाठी संस्थेच्या पुढाकाराने कुडोपी येथे कातळशिल्पांची स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेटचे कार्यकर्ते आणि आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे एनएसएस स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते.

Comments are closed.