यूएईसाठी डोकेदुखी ठरल्यानंतर वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानची परीक्षा घेणार! भारत- पाक महालढत होणार ‘या’ दिवशी
अंडर-19 आशिया कप 2025 (U19 Asia Cup) मध्ये टीम इंडियाची सुरुवात खूपच दमदार झाली आहे. 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची बॅट यूएई (UAE) विरुद्धच्या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने 171 धावांची वादळी खेळी केली. तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि असे वाटत आहे की तो यूएईप्रमाणेच पाकिस्तानच्या गोलंदाजांनाही सळो की पळो करून सोडेल. विशेष म्हणजे, अंडर-19 आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातही सामना होणार आहे. या सामन्यात सगळ्यांच्या नजरा वैभववर असतील.
वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध 95 चेंडूंमध्ये 171 धावांची शानदार खेळी केली. वैभव द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, पण एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो क्लीन बोल्ड झाला.
याच खेळीसोबत वैभव अंडर-19 आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. आता या स्पर्धेतील भारताचा पुढचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी दुबईच्या ICC अकादमी ग्राउंडवर दोन्ही देशांमध्ये हा सामना होणार आहे. सिनियर मेन्स आशिया कपमध्ये भारताने तीन वेळा पाकिस्तानला हरवले होते. आता अंडर-19 भारतीय संघही धमाल करायला उत्सुक आहे. वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि यूएईप्रमाणेच पाकिस्तानविरुद्धही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
वैभव सूर्यवंशीसाठी गेले दोन महिने खूप चांगले राहिले आहेत. त्याने आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये इंडिया ‘अ’ कडून खेळताना यूएईविरुद्ध 42 चेंडूंमध्ये 144 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 15 षटकार मारले होते. त्यानंतर 2 डिसेंबर 2025 रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहारकडून खेळताना महाराष्ट्राविरुद्ध 108 धावांची नाबाद खेळी केली होती.
आता त्याने यूएई अंडर-19 टीमविरुद्ध शतक ठोकले आहे. वैभव सूर्यवंशी सतत मोठ्या धावा करत आहे आणि 14 डिसेंबरला पाकिस्तानविरुद्धही तो अशीच दमदार खेळी करू शकतो.
Comments are closed.