IND vs SA: सूर्यकुमार यादव-शुबमन गिलच्या फॉर्मबद्दल संघाला चिंता नाही! दिग्गजांकडून मात्र प्रश्न उपस्थित
टीम इंडियाला (Team india) चंदीगढमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 51 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला (IND vs SA). आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये धावांच्या फरकानुसार, भारतामध्ये झालेला हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर, विशेषत कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि उपकर्णधार शुबमन गिल (Shubman gill) यांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कटक येथील विजय असो किंवा चंदीगढमधील पराभव, दोन्ही सामन्यांत शुबमन (4 आणि 0 धावा) आणि सूर्यकुमार (12 आणि 5 धावा) हे दोन्ही दिग्गज फ्लॉप ठरले. ही समस्या बऱ्याच काळापासून सुरू असल्याने चाहते आणि अनेक माजी क्रिकेटपटू या टॉप ऑर्डर फलंदाजांना लक्ष्य करत आहेत.
कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांनी मिळून कटक आणि चंदीगढच्या दोन्ही डावांमध्ये केवळ 21 धावा केल्या, आणि याचा मोठा फटका टीम इंडियाला चंदीगढच्या सामन्यात बसला. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाण यांनी मॅच हरल्यानंतर जियो हॉटस्टारवर सांगितले, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. दक्षिण आफ्रिकेने खूप चांगली गोलंदाजी केली. क्विंटन डी कॉक देखील फॉर्ममध्ये आला आहे, जी दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली बातमी आहे.
कसोटी आणि वनडेमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या शुबमन गिलसाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये मोठी खेळी खेळण्याची प्रतीक्षा लांबत चालली आहे. गिलने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आपले शेवटचे अर्धशतक दीड वर्षांपूर्वी, जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे केले होते. त्याच्या मागील 5 डावांपैकी 3 वेळा त्याला 5 धावांचा आकडाही पार करता आलेला नाही.
कर्णधार सूर्यकुमार यादवने कटक आणि चंदीगढच्या सामन्यांमध्ये मिळून एकूण 17 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने कोणतीही मालिका गमावलेली नाही, हे खरे आहे. मात्र, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सलग हा 20 वा डाव आहे, जेव्हा त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतकी खेळी पाहायला मिळालेली नाही.
सामन्यानंतर संघाचे सहायक प्रशिक्षक काय म्हणाले, हे देखील आश्चर्यकारक आहे. त्यांच्या मते, या फलंदाजांची बॅट न चालणे ही फार मोठी चिंतेची बाब नाही, कारण ते लवकरच फॉर्ममध्ये परत येऊ शकतात. टीम इंडियाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोस्काटे म्हणाले, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुबमनने मानसिकदृष्ट्या चांगले संकेत दिले होते, त्यामुळे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत तो लवकर बाद झाल्याबद्दल मी फारसे लक्ष देऊ इच्छित नाही.
कटकमध्ये आम्ही फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळायला सांगितले होते. आणि आजच्या सामन्यात तो एका चांगल्या चेंडूवर बाद झाला आणि तुमचा फॉर्म खराब असताना असे कोणासोबतही होऊ शकते. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पुढील सामना रविवार, 14 डिसेंबर रोजी धर्मशाळेत होणार आहे आणि या दोन्ही खेळाडूंवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.
Comments are closed.