शिक्षणभान – विद्यार्थ्यांसाठी फूड स्कॉलरशिप

>> मेधा पालकर
राज्याच्या कानाकोपऱयातून, विशेषत मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात येतात. मात्र शिक्षणाइतकेच त्यांच्या दैनंदिन जगण्याचे प्रश्नही गंभीर आहेत. अशा विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी `स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिप देऊन त्यांची भूक भागवत आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिपचा लाभ मिळाला आहे.
उपामामागे कार्यरत असलेले कुलदीप आंबेकर यांनी 2018 साली `स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड’ची स्थापना केली. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या. आर्थिक दुर्बलता, निवासाचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पौष्टिक आहाराची कमतरता या सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी फूड स्कॉलरशिपची कल्पना राबवली. आंबेकर सांगतात, ग्रामीण भागातून पुण्यात येणारे अनेक विद्यार्थी गरीब असतात. काहींचे पालक नाहीत किंवा एकल पालक आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी दररोज सकस अन्न देण्याची जबाबदारी आमची संस्था घेत आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळचे पौष्टिक जेवण आम्ही देतो. सध्या या उपामांतर्गत एकाच वेळी 500 विद्यार्थी लाभ घेत आहेत. संस्थेद्वारे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न कॉलेज, गरवारे कॉलेज, एस. पी. कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात दुपार व संध्याकाळच्या सत्रात जेवण दिले जाते.
कुलदीप आंबेकर पुढे सांगतात, आमचा उद्देश केवळ अन्नदान नाही, तर या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे आहे. आम्ही त्यांना करिअर गाईडन्स, व्यक्तिमत्त्व विकास आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही देतो. समाजातील दानशूर मंडळी या मुलांच्या जेवणासाठी देणगी देतात. जेवण तयार करणाऱया डबेवाल्या मंडळींना हे पैसे दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची भूक भागविणे शक्य होते. सामाजिक बांधिलकी समजून दानशूर पुढे आल्यास आणखी विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिमध्ये सामावून घेता येईल.
पुण्यात शिक्षण घेणाऱया ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड हा उपाम म्हणजे एक प्रकारचा आधारस्तंभ ठरला आहे. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू राहिले आहे. ही संस्था समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत असून कुलदीप आंबेकर यांचे हे सामाजिक कार्य अनेक समाजसेवकांसाठी आदर्श ठरत आहे.

Comments are closed.