पंकज चौधरी हे नवे अध्यक्ष असतील
अर्ज दाखल : बिनविरोध निवड शक्य : सात वेळा खासदार, दोन वेळा केंद्रीय मंत्री
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेश भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांबाबतचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि महाराजगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार पंकज चौधरी यांनी उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, ज्येष्ठ नेते महेंद्रनाथ पांडे आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे नामांकनाच्या वेळी उपस्थित होते. त्यांची निवड जवळपास बिनविरोध मानली जात असून आज रविवारी त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पंकज चौधरी यांच्या अर्ज दाखल झाल्यामुळे ते पक्षाचे पुढील प्रदेशाध्यक्ष असतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे. इतर कोणत्याही नेत्याने अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसल्यामुळे रविवारी पंकज चौधरी यांच्या नावाची औपचारिक घोषणा होऊ शकते. पंकज चौधरी हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते कुर्मी समाजाचे एक प्रमुख नेते असून ओबीसी समाजातील ठळक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याच्या शक्यतेने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. पक्षाने संघटना आणि सरकारमध्ये संतुलन राखण्यासाठी एका अनुभवी आणि तळागाळातील नेत्यावर विश्वास ठेवल्याचे त्यांच्या निवडीवरून लक्षात येते.
Comments are closed.