रोखठोक – ते आले आणि गेले! दिल्लीतला ‘पुतीन’ उत्सव

रशियाचे चेअरमन पुतीन दिल्लीत आले. मोदी यांनी पुतीन यांना भारतातील विरोधी नेत्यांना भेटू दिले नाही. हे लोकशाहीला धरून नाही. परदेशी राज्य प्रमुख दिल्लीत येतात तेव्हा विरोधी नेत्यांशी त्यांचा संवाद होतो. पुतीन यांच्या सन्मानार्थ सरकारने मेजवानी ठेवली. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण नाही. जणू पुतीन हे मोदीशहांचे मेहुणे जेवण मोदींच्या घरचे होते.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे 4 तारखेला दिल्लीत आगमन झाले. नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना मिठी मारली व पुढचे दोन दिवस ते पुतीन उत्सवात दंग राहिले. संपूर्ण दिल्लीत रस्ते बंद करून पुतीन यांच्या सुरक्षेला महत्त्व दिले. दिल्लीत आधीच जागोजाग अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे जाम सर्वत्र लागलेले असतात. हे दोन नेते बाहेर पडतात तेव्हा अर्धा तास आधी वाहतूक बंद केली जाते. लोकांचे त्यामुळे हाल होतात. शहा हे कृष्ण मेनन रोडवर राहतात. हा रस्ता व बाजूचे तीनही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जात असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. त्यात पुतीन यांच्या आगमनाची भर पडली. भाजप कार्यकर्त्यांनी आधी प्रे. ट्रम्प यांच्या आरत्या ओवाळल्या. आता हे सर्वच लोक ‘पुतीन’ यांच्या आरत्या ओवाळताना दिसले. हे चित्र गमतीचे होते. 6 तारखेला पुतीन निघून गेले. राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी मेजवानी ठेवली होती. मेजवानीनंतरच्या दुसऱया दिवशी दिल्लीच्या वृत्तपत्रांत एक छायाचित्र प्रसिद्ध झाले. राष्ट्रपती भवनातून लाल गालिचे गुंडाळून तंबूवाले ठेकेदार बाहेर पडत आहेत. पुतीन यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील तंबूवाल्यांकडून गालिचे भाडय़ाने आणले. पुतीन यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनातील गालिचे कमी पडले हे पहिले. दुसरे असे की, पुतीनसारखे परदेशी पाहुणे येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात पुरेसे गालिचे नाहीत. सर्व देखावा आणि नेपथ्य सजवले जाते. आपल्या पाठीमागे काय घडले याची पुतीन यांना कल्पना नाही. पुन्हा प्रे. ट्रम्प आणि पुतीन यापैकी कोणीही भारताच्या संकटसमयी ठामपणे मदतीला उभे राहिलेले नाहीत. प्रत्येकाला भारतात आपला माल संपवायचा आहे. प्रे. ट्रम्प यांना त्यांची संरक्षण सामग्री भारताच्या गळय़ात मारायची आहे. पुतीन यांना त्यांचे तेल विकायचे आहे. भारताचा कणा गेल्या दहा वर्षांत मोडून पडल्याने जो येतो तो भारताची पिळवणूकच करतोय.

खरंच मित्र आहे काय?

रशिया भारताचा एकेकाळी सगळय़ात भरवशाचा मित्र होता. हे त्यांनी अनेकदा कृतीने दाखवून दिले. रशियातील पिढय़ा बदलल्या तरी नेहरू-गांधी व राज कपूर यांच्यावरचे त्यांचे प्रेम कमी झाले नाही. याचा अनुभव मी स्वत: मास्कोत घेतला आहे. रशियाचे असंख्य तुकडे त्यानंतर पडले. त्यामुळे तो बलाढय़ रशिया आज राहिलेला नाही, पण अमेरिका, चीननंतर रशियाचा जागतिक वावर ‘महासत्ते’सारखा आहे हे मान्य करावे लागेल. रशिया चीनच्या बाजूने की भारताच्या याचे रहस्य उलगडायचे आहे. रशियाला भारताशी मैत्री आता हवी आहे ती चीनला खेळवत ठेवण्यासाठी, पण चीनला ‘लाल आंख’ दाखवण्याची हिंमत भारतीय राज्यकर्त्यांत आहे काय, हा खरा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदींचे भक्त त्यांना विश्वगुरू वगैरे उपाध्या देतात. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचा डांगोरा पिटला जातो, पण भारताचा रुपया रोज घसरतो आहे व डालर्सच्या तुलतेन रुपयाने नव्वदी पार केली. हे दु:खद आहे. ज्या देशाचे चलन असे कोसळत आहे तो देश जगात ताठ मानेने कसा उभा राहणार?

विमानतळावर गोंधळ

रशियाचे अध्यक्ष पुतीन दिल्लीत आले तेव्हा एकंदरीत भारताचे काय चित्र होते? भारतातील सर्व विमानतळांवर अराजक माजले होते. हवाई वाहतूक पूर्णपणे कोलमडून पडली होती व लाखो प्रवासी विमानतळावर चार दिवसांपासून अडकून पडले होते. सर्व वृत्तपत्रांत पुतीन-मोदी गळाभेटीच्या छायाचित्रांच्या बाजूला भारतातील हवाई अराजकाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. पुतीन यांना भारताचे हे असे दर्शन घडले. पुतीन यांनी मोदी यांचे कौतुक केले, पण ‘आापरेशन सिंदूर’च्या वेळी पुतीन हे कुंपणावरच होते व आज पुतीन यांना भारतापेक्षा चीन प्रिय आहे. चीन भारताविरोधात पाकिस्तानला उघड मदत करत आहे. लढाऊ विमाने, शस्त्रे, दारूगोळा पुरवत आहे. पुतीन व पाकिस्तानचे संबंधही चांगले आहेत. त्यामुळे मोदी-पुतीन गळाभेटीला अर्थ नाही. पुतीन यांच्या भारत भेटीनंतर रशियात एखादा मोठा प्रकल्प गौतम अदानी यांना मिळेल. बाबा रामदेवच्या ‘पतंजली’ उद्योगाने मास्को सरकारशी एक करार दिल्लीत केला. त्यानुसार पतंजलीने मास्कोला प्रशिक्षित कामगार (Skilled Labour), आरोग्य सेवा (Wellness Service) पुरवण्याचे कंत्राट मिळवले. पुतीन भेटीत भाजप पुरस्कृत व्यापार मंडळाने आपापले काम साधून घेतले. बाबा रामदेव यांची आरोग्यविषयक उत्पादने ‘बोगस’ असल्याचे अनेकदा उघड झाले. त्यांचे तूपसुद्धा भेसळीचे निघाले, पण भारतात न चाललेली आरोग्य सेवा ते आता रशियाला पुरवतील व व्यापार करतील.

विरोधकांना डावलले

पुतीन यांच्या सन्मानार्थ सरकारने शाही मेजवानी ठेवली. त्या मेजवानीस संसदेच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण दिले गेले नाही. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात उभे राहून सांगितले की, “विदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिले जात नाही. हे लोकशाहीविरोधी आहे.” जणू पुतीन हे मोदी-शहांचे मेहुणे आहेत व मोदी-शहांनी पुतीन यांना आपल्या घरी जेवायला बोलावले. त्यामुळे तेथे कोणाला बोलवायचे हा आमचा प्रश्न अशा पद्धतीने हे सर्व घडत आहे. परदेशी पाहुणे येतात तेव्हा देशातील प्रमुख विरोधी नेत्यांशी त्यांच्या भेटी होतात. यात लोकशाहीचा सन्मान असतो, पण मोदी आल्यापासून ही परंपरा बंद पडली. आपले विरोधी पक्षनेते उच्चशिक्षित आहेत. त्यांचा जागतिक राजकारणाचा अभ्यास पक्का आहे. ते परदेशी पाहुण्यांवर आपल्यापेक्षा जास्त छाप पाडतील, अशी भीती पंतप्रधान मोदी यांना वाटत असावी. भारतात लोकशाही आहे, पण विरोधी पक्षाला आम्ही किंमत देत नाही, असा देखावा पंतप्रधान मोदी यांनी उभा केला तो पुतीन यांना आवडला असेल. त्यांच्या देशातील लोकशाहीची स्थिती भारतापेक्षा वेगळी नाही. रशियात संसदेपासून सर्व संस्था पुतीन यांच्या टाचेखाली आहेत. पुतीन निवडणुका एकतर्फी जिंकतात. पुतीन यांच्या विरोधात आवाज उठवणाऱयांना गायब केले जाते. विरोधी पक्षाचे अस्तित्व रशियात आज दिसत नाही. पुतीन यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध संघर्ष करणारे प्रमुख विरोधी नेते एलेक्सी नवलनी यांना आधी विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यातून ते वाचले तेव्हा देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करून सैबेरियातील तुरुंगात डांबले व तुरुंगातच त्यांना ठार केले. ही रशियातील लोकशाही आणि विरोधी पक्षाची स्थिती. त्यामुळे पुतीन यांना दिल्ली मानवली व तुमच्या देशात विरोधी पक्ष आहे काय, हा प्रश्नही त्यांनी मोदी यांना विचारला नसेल. 2004 ते 2014 पर्यंत लोकसभा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते 162 विदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटले. नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेसच्या पंतप्रधानांनी विरोधी नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिष्टमंडळे विदेशात व युनोत पाठवली. पुतीनपासून ओबामांपर्यंत अनेक जागतिक नेते 2014 च्या आधी दिल्लीत आले व सोनिया गांधींना भेटले. या औपचारिक भेटी असतात, पण मोदी सरकारने लोकशाहीच्या सर्व परंपरा मोडल्या. आमच्या देशात विरोधी पक्ष आम्ही संपवला आहे हे चित्र त्यांनी जागतिक नेत्यांसमोर उभे केले. पुतीन आले, त्यांनी भारताच्या विमानतळांवरील अराजक पाहिले. विरोधी पक्षाचा आवाज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. त्याच वेळी भारतीय संसदेत ‘वंदे मातरम्’वरून सत्ताधारी पक्षाचे विरोधकांकडून पानिपत सुरू झाले होते!

विरोधी पक्षाचा गळा दाबून पंतप्रधान मोदी स्वत:च गुदमरले!

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Comments are closed.