प्रेरणा – दृढनिश्चयाचा प्रवास

>> वर्णिका काकडे

औषध निर्माण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण नाव म्हणजे 'सुप्रिया लाइफसायन्सेस' औषध निर्माण क्षेत्रात भारताला जागतिक ओळख मिळवून देणाऱया या कंपनीचे संस्थापक, संचालक डॉ.. सतीश वाघ यांच्या प्रवासाची ही ओळख.

महत्त्वाकांक्षा आणि जिद्दीचा प्रवास तुम्हाला घडवतो. असाच एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून घडलेला प्रवास आहे ‘सुप्रिया लाईफसायन्स’चे संस्थापक, संचालक डॉ. सतीश वाघ यांचा. मोठय़ा ध्येयाचे स्वप्न उराशी बाळगत जिद्द आणि दृढनिश्चयाचे उदाहरण त्यांनी स्थापन केलेल्या ‘सुप्रिया लाईफसायन्स’च्या यशात दिसून येते.

अनेक तरुणांप्रमाणेच डॉ. सतीश वाघ हे उज्ज्वल भविष्याचा विचार करत. रासायनिक व्यवसायात गुंतलेल्या कुटुंबात वाढल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना विज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते त्यांच्या काकांसोबत त्यांच्या औषध कंपनीसोबत काम करू लागले. काकांच्या उद्योजकीय भावनेने प्रेरित होऊन त्यांनी स्वतचा व्यवसाय सुरू करण्याचे योजिले.

डॉ. सतीश वाघ यांच्यासाठी हा केमिकल व्यवसाय उभे करणे आव्हानांनी भरलेले होते. काकांच्या काळात आवश्यक परवाने आणि औपचारिकता जाणून घेतलेल्या असूनही आर्थिक संघर्ष करावा लागला. हा प्रवास सोपा नव्हता; परंतु अथक प्रयत्नांनंतर तो अखेर यशस्वी झाला.

सुप्रिया लाईफसायन्सची स्थापना

1987 मध्ये, डॉ. सतीश वाघ यांनी सुप्रिया लाईफसायन्सेसची स्थापना केली तेव्हापासून त्यांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. आज ही कंपनी 120 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून 40 हून अधिक अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट्स (एपीआय) च्या विविध पोर्टफोलिओसह 2000 हून अधिक ग्राहकांना सेवा देते. सतीश यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया लाईफसायन्सेसने अमेरिका, युरोप, जपान, लॅटिन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह प्रमुख बाजारपेठांमध्ये ओळख मिळवली आहे. कंपनी आता अँटी-हिस्टामाइन आणि अँटी-अॅलर्जीक औषधांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक म्हणून ओळखली जाते. औषध निर्माण क्षेत्रात भारताला जागतिक ओळख मिळवून देण्यात सुप्रिया लाईफसायन्सेसचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सध्या 1,000 हून अधिक व्यक्तींना रोजगार देणारी आणि 570 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवणारी सुप्रिया लाईफसायन्स पुढील तीन वर्षांत 1,000 कोटी रुपयांची उलाढाल गाठेल. कंपनीच्या या उज्ज्वल यशाबाबत डॉ. सतीश सांगतात, सुप्रिया लाईफसायन्स 1987 मध्ये एक केमिकल ट्रेडिंग कंपनी म्हणून अस्तित्वात आली. पुढे 1996 मध्ये औषधनिर्माण क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हापासून बहुआयामी व्यावसायिक दाष्टकोन कायम ठेवतच कंपनीची वाटचाल सुरू राहिली आहे.’

डॉ. सतीश वाघ हे त्यांच्या व्यवसायाप्रति वचनबद्ध आहेतच, परंतु सोबतच समाजासाठी त्यांचा सीएसआर उपामातही तितकाच सहभाग आहे. सुप्रिया लाईफसायन्सेस लिमिटेडच्या सीएसआर प्रकल्पांद्वारे पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत जागरूकता निर्माण करीत वंचितांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी सुप्रिया लाईफसायन्सेसने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन प्राणी दत्तक घेतले असून वाघ आणि सिंह सफारीदरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सफारी व्हॅन, पोलीस इंधन केंद्रांवर सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत. यासोबतच त्यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे.

केवळ वैयक्तिक यश महत्त्वाचे नसून समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देखील गरजेचे आहे हेच त्यांच्या कृतीतून अधोरेखीत होते. उद्योजक, निर्यातदार आणि नवोन्मेषक म्हणून उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले डॉ. सतीश वाघ यांच्या कार्याची मुख्य प्रेरणा आहेत रतन टाटा. इतक्या यशानंतरही त्यांनी त्यांची व्यवसाय तत्त्वे कधीही बदलली नाहीत. डॉ. वाघ यांना रासायनिक उद्योगांच्या सर्व बारकाव्यांचे आणि विविध बाजारपेठांमधील नियामक चौकटींचे चांगले ज्ञान व प्रचंड अनुभव असल्यानेच आयआयएम अहमदाबाद, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे आणि आयआयएफटी, दिल्लीसारख्या आघाडीच्या बिझनेस स्कूलमधून त्यांना व्यवसाय आणि उद्योजकतेवर व्याख्यानांसाठी आमंत्रित केले जाते.

डॉ. सतीश वाघ यांना लघु उद्योग मंत्रालयाकडून 1999 मध्ये लघु उद्योगांमध्ये संशोधन आणि विकास प्रयत्नांसाठी राष्ट्रीय पुरस्कार, एमएसएमई मंत्रालयाकडून 2007 मध्ये उत्कृष्ट उद्योजकता प्रयत्नांसाठी राष्ट्रीय पुरस्कार, लघु उद्योग मंत्रालयाकडून 2003 मध्ये मूलभूत औषधांच्या निर्मितीसाठी लघु क्षेत्रातील दर्जेदार उत्पादनांसाठी राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उद्योजकतेतील प्रवास सोपा नसला तरी पुढे जाण्याची प्रेरणा मेहनत आणि महत्त्वाकांक्षेतूनच मिळत राहते. डॉ. सतीश वाघ नवउद्योजकांसाठी म्हणूनच एक प्रेरणास्थान आहेत.

Comments are closed.