‘राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय’, भाजप पदाधिकाऱ्

दत्ता प्रसाद जाधव: भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आणि धाराशिव जिल्हा प्रभारी दत्तप्रसाद जाधव यांच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायक क्षणांना शब्दरूप देणारी एक अत्यंत भावूक फेसबुक पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्नी कुंता जाधव यांच्या आकस्मिक निधनाला बरोबर एक महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लिहिलेली ही पोस्ट केवळ वैयक्तिक दुःख व्यक्त करणारी नसून, संघर्ष, प्रेम, निष्ठा आणि अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची हळवी कहाणी सांगणारी ठरली आहे.

Dattaprasad Jadhav: 15 वर्षांचा सहजीवनाचा प्रवास शब्दांत मांडला

दत्तप्रसाद जाधव यांनी पोस्टमध्ये पत्नीला ‘राणी’ या प्रेमळ नावाने संबोधत, त्यांच्या 15 वर्षांच्या सहजीवनाचा संपूर्ण प्रवास आठवणींच्या रूपाने मांडला आहे. 15 वर्षांपूर्वी पहिल्यांदा झालेली भेट, संवादातून फुललेले प्रेम, दोन वर्षांच्या ओळखीनंतर घेतलेला विवाहाचा निर्णय आणि 11 जून 1012 रोजी सर्वांच्या साक्षीने झालेला ‘लव्ह विथ अरेंज मॅरेज’ — हे सारे प्रसंग त्यांनी अत्यंत भावनिक शब्दांत लिहिले आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही पत्नीने प्रेमाखातर लग्न स्वीकारले, तिच्या कुटुंबानेही त्यांना समजून घेतले, याचा उल्लेख करत त्यांनी पत्नीच्या त्यागाची जाणीव व्यक्त केली आहे.

Dattaprasad Jadhav: संघर्षात दिलेली खंबीर साथ

लग्नानंतर आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, मात्र कुणापुढेही तक्रार न करता दोघांनी मिळून परिस्थितीशी सामना केल्याचे त्यांनी लिहिले आहे. पत्नीचे आरएएनएम (RANM) नर्सिंग शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी संभाजीनगर येथे मिळेल ते काम केले. “तू सोबत होतीस म्हणून कोणत्याही कामाची लाज वाटली नाही,” असे त्यांनी भावुकपणे नमूद केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नीनेही नोकरी करून कुटुंबाला आधार दिला. जीवनातील चढ-उतार, आनंद आणि दुःखाचे क्षण त्यांनी दोघांनीही हसत-खेळत पार केल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

Dattaprasad Jadhav: मुलं, स्वप्नं आणि आनंदी संसार

2016 मध्ये मोठा मुलगा हर्षद आणि 2021 मध्ये धाकटा मुलगा हार्दिक यांच्या जन्माने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला एकच अपत्य असावे असा निर्णय असतानाही पत्नीच्या इच्छेमुळे दुसरे अपत्य झाले, याचा उल्लेख त्यांनी प्रेमाने केला आहे. “मोठा मुलगा तुमच्यावर आणि धाकटा माझ्यावर गेला आहे,” असे पत्नीचे बोलणे आजही कानात घुमत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

Dattaprasad Jadhav: अत्यंत कठीण काळात पत्नीचाच आधार

तीन वर्षांपूर्वी आयुष्यात आलेल्या गंभीर संकटाचा उल्लेख करताना पोस्ट अधिकच वेदनादायक होते. “जगावे की मरावे हेच समजत नव्हते,” अशा अवस्थेत पत्नीने दिलेल्या धीरामुळेच जीवनात पुन्हा उभे राहता आले, असे त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे. “मै तेरे साथ हूँ ना” या शब्दांमुळेच आपण आत्महत्येचा विचार टाळू शकलो, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.

Dattaprasad Jadhav: स्वप्नांची पूर्तता आणि अपूर्ण राहिलेला आनंद

कठीण परिस्थितीतून बाहेर पडत आर्थिक स्थिती सुधारली. घर, जमीन, वाहन अशी स्वप्ने पूर्ण झाली. पत्नीच्या नकारानंतरही दिवाळीला तिच्यासाठी सोने घेतल्याची आठवण त्यांनी लिहिली आहे. पत्नी आणि मुलांसाठी सर्व सुविधा असलेले सुंदर घर बांधण्यात आले होते आणि लवकरच मोठ्या थाटामाटात वास्तुशांती व गृहप्रवेश करण्याचे नियोजन सुरू होते. मृत्यूच्या काही दिवस आधीच दोघांमध्ये झालेल्या संवादात, आता फक्त मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचे, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण द्यायचे, याबाबत चर्चा झाली होती. लग्नावेळी न जमलेले सर्व नातेवाईक एकत्र येतील, अशी आशा दोघांनी व्यक्त केली होती.

Dattaprasad Jadhav: अचानक आलेला आघात

सर्व काही सुरळीत सुरू असताना 10-11-2025 रोजी पत्नीचे अचानक निधन झाले. “तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे,” “तुला माझी आणि मुलांची काळजी वाटली नाही का?” अशा प्रश्नांनी पोस्ट अधिकच हृदयद्रावक होते. धाकटा मुलगा हार्दिक आईशी बोलण्यासाठी फोन करण्याचा हट्ट धरतो, त्या क्षणी मनाची अवस्था शब्दांत न मावणारी असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

Dattaprasad Jadhav: ‘शक्य झाल्यास परतून ये…’

पोस्टच्या शेवटी पत्नीला उद्देशून त्यांनी दुसऱ्या जन्मी पुन्हा पत्नी म्हणून सोबत येण्याची आर्त विनवणी केली आहे. मुलांचे संगोपन आणि सामाजिक कर्तव्ये शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करत, “तू जिथे असशील तिथून आमच्यावर लक्ष ठेव,” असे भावूक शब्द त्यांनी लिहिले आहेत.

“राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतो आहे,” या ओळींनी संपणारी ही पोस्ट वाचकांच्या मनाला चटका लावणारी ठरत असून, हजारो लोकांनी ती शेअर करत जाधव कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट प्रेम, त्याग आणि आयुष्याच्या अनिश्चिततेचे वास्तव मांडणारी असल्याने ती समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा

19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप! मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

आणखी वाचा

Comments are closed.