पाकिस्तानात गिरवले जाणार संस्कृतचे धडे, फाळणीनंतर लाहोर विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे शिकवले जाणार आहे. लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्कृत भाषेतील महाभारत आणि भगवद्गीतादेखील विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने दिली. पाकिस्तानात आगामी 10 ते 15 वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील, असा विश्वास लाहोर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी व्यक्त केला आहे.
लाहोर विद्यापाठात संस्कृत भाषेचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये प्रा. डॉ. शाहिद राशिद यांचे मोलाचे योगदान आहे. संस्कृत भाषेकडे हिंदु धर्माशी संबंधित भाषा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे हिंदू धर्माशी संबंधित संस्कृत भाषा अभ्यासक्रमासाठी का निवडली, असा प्रश्न राशिद यांना वारंवार विचारला जात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राशिद म्हणाले की, संस्कृत भाषा का शिकू नये?, संस्कृत भाषेमध्ये मोठय़ा प्रमाणात लेखन हे सिंधू संस्कृतीच्या वेळी पाकिस्तानात झाले. संस्कृतचे व्याकरणकार पाणिनी यांचा जन्मदेखील पाकिस्तानात झाला आहे, असे ते म्हणाले.
संस्कृत भाषेतील दस्तावेज
पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणात संस्कृतमधील प्राचीन दस्तावेज आहेत. पंजाब विद्यापीठात पाम वृक्षाच्या पानावर लिहिलेले संस्कृत भाषेतील दस्तावेज आहेत. 1930 साली संस्कृत अभ्यासक जेसीआर वुलनार यांनी हे दस्तावेज जमा केले होते. त्या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून लोक येत असतात. पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे दिल्यास येथील चित्र नक्कीच बदलेल, असे डॉ. अली उस्मान कासमी यांनी म्हटले आहे.

Comments are closed.