ज्यू नागरिकांवरील दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन, हल्लेखोर निघाले बाप-लेक, बाप पाकिस्तानी नागरिक

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचे पाकिस्तानी कनेक्शन उघड झाले आहे. हल्ला करणारे पिता-पुत्र असून 50 वर्षीय साजिद अक्रम हा रविवारीच पोलिसांच्या गोळीने ठार झाला होता, तर त्याचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम यालाही पोलिसांची गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढून 16 वर गेला आहे, तर 45 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी दहशतवाद्यांसंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, साजिद अक्रम हा 1998मध्ये विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. त्याने व्हेरेना नावाच्या ऑस्ट्रेलियन महिलेशी विवाह केला आणि आपला व्हिसा पार्टनर व्हिसामध्ये परिवर्तित केला. तेव्हापासून तो रेसिडेंट रिटर्न व्हिसावर वास्तव्य करत होता. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व नव्हते. अक्रम हा पाकिस्तानातून दाखल झाल्याची माहिती आहे, ती पडताळण्यात येत आहे. नवीद याचा जन्म 2001मध्ये ऑस्ट्रेलियात झाला होता. त्यामुळे तो जन्मापासून ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे, असे बर्क यांनी स्पष्ट केले.

मासेमारी करायला जात असल्याचे सांगून केले सैतानी कृत्य

साजिद याचे फळांचे दुकान होते. साजिद अक्रम याच्याकडे बंदुकीचा परवाना होता. त्याच्याकडे कायद्याने परवानगी मिळालेल्या 6 बंदुकी होत्या. बंदुकींचा वापर तो शिकारीसाठी करायचा. अक्रम पिता-पुत्रांनी घरी सांगितले होते की, आम्ही मासेमारी करायला जात आहोत, मात्र त्यांनी बीचवर हनुक्का सण साजरा करणाऱया ज्यू नागरिकांवर गोळीबार केला. पोलिसांना घटनास्थळावरून ‘आयईडी’देखील आढळले, मात्र ती प्राथमिक स्वरूपातील होती.

नवीदने दहशतवादी हल्ला केला? आईचा विश्वास बसेना

नवीदने दहशतवादी हल्ला केला, यावर त्याची आई व्हेरेना हिचा विश्वास बसला नाही. तिने सांगितले की, माझ्या मुलाने दहशतवादी हल्ला केला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. तो खूप चांगला आहे. मद्यपान किंवा धूम्रपानही तो करत नाही, तो कधीही वाईट संगतीत नव्हता. तो सध्या बेरोजगार होता.

साजिदला भिडणारा अहमद ऑस्ट्रेलियात सुपरहीरो

43 वर्षीय अहमद अल अहमद यांनी साजिदवर झेप घेतली आणि त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. त्यानंतर नवीदने अहमद यांच्यावर गोळी झाडली. घटना घडली त्यावेळी अहमद हे चुलत भाऊ जोजॉय अल्कांज यांच्यासोबत फिरत होते. अहमद यांना भावाने रोखले होते. त्यावेळी अहमद त्याला म्हणाले की, ‘मला काही झाले तर घरच्यांना सांगा की लोकांचे प्राण वाचविताना माझा मृत्यू झाला.’ अहमद यांच्यासाठी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून एका दिवसात 5.70 लाख डॉलर म्हणजे सुमारे 3.43 कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत.

Comments are closed.