दिल्लीतील प्रदूषणामुळे घरातूनच शिक्षण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घरात राहूनच ऑन लाईन शिक्षण घ्यावे, असा आदेश काढण्यात आला आहे. परिणामी, दिल्लीतील शाळांचे पाचवी पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच इयत्ता सहावी ते इयत्ता 9 वी पर्यंतचे वर्ग तसेच 11 वीचे वर्ग ‘हायब्रीड मोड’ मध्ये चालणार आहेत. विद्यार्थ्यांना वायू प्रदूषणाचा त्रास कमीत कमी व्हावा, यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घरातूनच शिक्षण दिले जात आहे.
दिल्लीत प्रदूषण धोकादायक स्तरापर्यंत पोहचल्याने तेथील राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून येत्या एक वर्षभरात प्रदूषणाच्या समस्येवर स्थायी स्वरुपाचा तोडगा काढला जाईल, असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.