रेहमान डकैत कोण, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे; संजय राऊत यांचे टीकास्त्र

मुंबई शहराचे लयारी शहर कुणी केले आणि रेहमान डकैत कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

”महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे तब्येत सुधारायला हवी. उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊन तुमच्यासमोर उभा आहे बोलायला. काल तारखा जाहीर झाल्या त्यानंतर अंगात उत्साह संचारला आहे. औषधं वगैरे नंतर चालूच राहिल. ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. मराठी माणसाने कोणत्याही परिस्थितीत असो त्याने या लढ्यात उतरायला हवे. मुंबईत गेल्या काही दिवसात पोस्टर लागले. मुंबईला वाचवण्यासाठी. सरकारला भिती वाटली त्यांनी ते एका रात्रीत काढले. का तर म्हणे आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता मराठी माणसाला, विरोधी पक्षाला. पण हे जे सरकार आहे त्यांना काय? निवडणूक जाहीर व्हायच्या दहा मिनिटं आधीपर्यंत सरकार घोषणा करत होते. हा आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देताय”, अशी टीका संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केली.

”या निवडणूकीत पैशाचं वाटप भरपूर होणार. 15 लाखांची खर्चाची मर्यादा आहे. निवडणूक आयोग हे खात्रीने सांगू शकेल की सत्ताधारी पक्ष 15 लाखापर्यंत थांबू शकेल का? जो सत्ताधारी पक्ष नगरपंचायती निवडणूकांमध्ये 100 कोटी खर्च करतो तो नगरपालिकेसाठी 15 लाखापर्यंत थांबेल का? नगरसेवक फोडण्यासाठी पाच कोटी खर्च केले, तो 15 लाखापर्यंत थांबेल का? निवडूण आयोग या विरोधात कोणती यंत्रणा राबवणार आहे. की मुंबई मराठी माणसाच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे का? प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येक माणसाची असायला हवी. त्या पद्धतीची जागरुकता उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्यामुळे निर्माण झाली आहे. मुंबई सह 29 महापालिकांमध्ये उतरायला सज्ज आहोत. भलेही तुम्ही पाठीमागून वार करा आमच्यावर. पण इतिहासात नोंद राहिल की मुंबई मराठी माणसांपासून तोडण्यासाठी, मुंबई उद्योगपतींना देण्यासाठी एक वर्ग आसुसलेला असताना, शिवसेना व मनसेतील लोकं मुंबई मराठी माणसाच्या हातात राहण्यासाठी शौर्याने व धैर्याने उतरले होते ही इतिहासात नोंद होईल. त्यानंतरच लोकांना कळेल की या महाराष्ट्राचे गद्दार कोण आणि खुद्दार कोण?, असेही ते म्हणाले.

”या क्षणी माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पुणे, नाशिक आम्ही एकत्र लढत आहोत. इतर महापालिकेत स्थानिक नेते निर्णय घेतील. ही लढाई 29 महापालिकेपेक्षा ही लढाई मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा देखील मुंबईचा होता. मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून १९५६ साली लढा सुरू झाला व 106 लोकांनी त्यात बलिदान दिलं. त्या बलिदानाची तयारी आम्ही आजही ठेवली आहे. पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहित आहे की रेहमान डकैत कोण आहे, कुणाला मुंबई लुटायची आहे? त्यांना हे पाठबळ देणार कोण आहेत, या मुंबईचं कराचीतील लयारी शहर कुणी केलंय हे अख्ख्या मुंबईला, महाराष्ट्राला व देशाला माहित आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.