संतापजनक! एक लाखाच्या कर्जासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली

चंद्रपुर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका सावकाराने कर्जाचा परतावा मिळविण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला. रोशन सदाशिव कुडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50-50 हजार रुपये घेतले होते. येथेही त्यांना नशिबाने दगा दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या. त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. अखेर त्या शेतकऱ्याने कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांची दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. मात्र कर्ज काही संपेना. एक लाखाचे 74 लाखावर गेले. शेवटी कर्ज दिलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.

सावकारापुढे पोलीस हतबल..

अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाठतो. येथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते. मात्र कुडे यांच्याबाबत तसं घडलं नाही. कुडे यांनी सांगितलं, पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांकडे मी तक्रार दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर कुडे यांच्यावर दुदैवी प्रसंग ओढवला नसता.

तर मंत्रालयात पुढे कुटुंबासहित आत्मदहन

एक लाख कर्ज उचललं. 74 लाख दिले मात्र अजूनही कर्ज पूर्णपणे संपलं नाही. पैशांसाठी तगादा सुरुच आहे. कर्जासाठी किडनी गेली. आता हाती काहीच उरलं नाही. आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासहित आत्मदहन करून मोकळा होतो, असं कुडे म्हणालेत.

Comments are closed.