IPL 2026 लिलावात 'या' भारतीय खेळाडूचा मोठा तोटा! तब्बल 16.75 कोटींचा बसला फटका
अबू धाबी येथे सुरू असलेल्या आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात एकीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनवर पैशांचा पाऊस पडला, तर दुसरीकडे एका भारतीय खेळाडूचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या मेगा लिलावात ज्या खेळाडूवर मोठी बोली लागली होती, त्याची किंमत यंदा कमालीची घटली आहे. तो खेळाडू म्हणजे भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venktesh Iyer). गेल्यावेळच्या तुलनेत त्याला 16.75 कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या वर्षीच्या आयपीएल मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) वेंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांच्या प्रचंड किमतीत विकत घेतले होते. मात्र, आयपीएल 2025 च्या हंगामात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली, ज्यामुळे केकेआरने त्याला संघातून रिलीज (Release) केले. त्यानंतर वेंकटेशने आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर आपले नाव नोंदवले होते.
लिलावात वेंकटेशला खरेदी करण्यासाठी काही संघांनी रस दाखवला, पण कोणीही मोठी बोली लावली नाही. अखेर आयपीएल 2025 चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने त्याला 7 कोटी रुपयांना विकत घेतले. वेंकटेश पुढच्या वर्षी आरसीबीच्या जर्सीत खेळताना दिसेल खरा, पण त्याच्या मानधनात मोठी घट झाली आहे.
गेल्या हंगामात 23.75 कोटी घेणाऱ्या वेंकटेशला आता केवळ 7 कोटी रुपये मिळणार आहेत. डाव्या हाताचा फलंदाज वेंकटेश अय्यरने 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो केकेआरकडूनच खेळत आला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 62 सामने खेळले असून 29.95 च्या सरासरीने एकूण 1468 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आयपीएल 2025 चा हंगाम त्याच्यासाठी खूपच खराब ठरला. त्याने 11 सामन्यात केवळ 142 धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्याची किंमत यंदा घसरली आहे.
Comments are closed.