क्रिकेटनामा – एक संवाद… सूर्याशी!

>> संजय कऱ्हाडे

सूर्या, अरे तुला झालंय तरी काय? तीनशे साठ डिग्रीचा चौफेर फलंदाज म्हणून रवी शास्त्री त्याचं कौतुक करायचा. रवी सहजासहजी कौतुक करत नाही. तू मात्र ते कमावलं होतंस. तुझ्या फटक्यांनी प्रत्येक मैदानाचा हरएक कोपरा पाहिला होता. मग, गेल्या काही काळात तुझ्या बॅटचा लौकिक कुठे दडून बसलाय?

फार जुन्याला मारू गोळी. आफ्रिकेविरुद्धचे टी ट्वेंटीचे पहिले तीन सामने पाहू. आजपर्यंतच्या तिन्ही सामन्यांत उतावळेपणाने बाद झालास. एका षटकात एक षटकार आणि एक चौकार मारल्यावर पुन्हा धावांचा हव्यास का? दुसऱयात एकाकडी चेंडूत एकाकडी धावा. तिसऱयात पुन्हा लागोपाठ दोन चौकार, तोच नाद, तसाच बाद! तिसऱया सामन्यातलं आव्हान सोपं होतं. नाबाद खेळी करण्याचा तू प्रयत्नच केला नाहीस!

हे मुंबईच्या खेळाडूंचं लक्षण नव्हे. मुंबईचा फलंदाज इतक्या सोप्यात ना हार मानतो ना हाराकिरी करतो! आपल्या मुंबईची खडूस वृत्ती जगजाहीर आहे. टी ट्वेंटीचं स्वरूप हाणामारीचं आहे हे मान्य, पण तीसुद्धा शिस्तीत होऊ शकते. यापूर्वी तूच केलेली आहेस. पण हल्ली तू लढाईतून, झुंझीतून माघार घेतल्यासारखं वाटतंय. निवृत्तीला आता दोनच महिने राहिलेत, ‘जाऊ-दे’चा होरा का लावलायस!

तुझ्या धावा होत नव्हत्या, तरी आशिया कपपर्यंत आमच्या आशा जिवंत होत्या. मात्र, आशिया कप स्पर्धेच्या सुरुवातीलाच अनावश्यक वल्गना करून बसलास. कदाचित, स्वतःच्या स्वभावाविरुद्ध! हस्तांदोलन, पाकविरुद्धचा विजय पहलगामच्या निष्पाप पर्यटकांना समर्पित करणं, आशियाई स्पर्धेचं मानधन पर्यटकांच्या कुटुंबीयांना देणं इत्यादी. ऑपरेशन सिंदूर आटोपल्यानंतर चार-पाच महिन्यांनी त्याला काय अर्थ होता? असो. देशभक्ती म्हणा, भीड म्हणा, संकोच किंवा कुठलं दडपण. आय.सी.सी.नेसुद्धा कारवाई केलीच. सूर्या, हे सारं मागे टाकून मैदानावर धावा करण्यासाठी डोक्यात बर्फ असावा लागतो!

आजपर्यंत कधी कुणी मोठा, दिग्गज मुंबईकर क्रिकेटपटू असा गुरफटलेला पाहिलायस? आता यातून बाहेर पडण्यासाठी तुलाच इच्छाशक्ती दाखवावी लागेल. मन खंबीर करावं लागेल. धावांसाठी मात्र तुझं मन रोहितसारख्या मित्राकडे मोकळं कर. यशस्वीने वनडेत नुकतंच यश मिळवलं तेव्हा त्याला रोहितनेच मदत केली होती!

तुझ्यासारख्या गुणी फलंदाजाने धडाडीने खेळावं अशी आम्हा मुंबईकरांची आणि देशाची इच्छा आहे. तुझा तो वकूब आहे. मात्र, अपयशाची तुझी कारणं ऐकून आश्चर्य वाटतं. तू पढवलेले डायलॉग मारतोयस! ‘आय ऍम आऊट ऑफ रन्स, नॉट आउट ऑफ फॉर्म’ म्हणजे काय? धावा होत नाहीत तेव्हाच फॉर्म हरवला असं म्हणतात ना? शशी थरूरना तुझं नाव सांगू का? ‘पिस्तौल तो मेरे पास भी हैं. लेकीन इस वक्त मेरे साथ नहीं है’, असं ‘मेरे अपने’मध्ये छेनू श्यामला म्हणाला होता. त्याचं प्रत्युत्तर म्हणून श्याम म्हणाला होता, ‘आइंदा से पास रखना!’

सूर्या, तू धावा कर रे! नको त्या गोष्टींत गुंतल्याचं दडपण आलंय तुझ्यावर. झुगारून दे! तू खेळाडू आहेस, खेळाडूच रहा!

स्वतःचं अनुमान बांधून काही कठोर निर्णय घे. विश्वचषकापर्यंत अभय मिळण्याच्या हमीवर भुलून जाऊ नकोस. विचारमंथन कर! तुला हमी देणारे आपल्या वाटेने निघून जातील. तुझ्या भविष्याची त्यांना चिंता नाहीये. धावा झाल्या नाहीत तर तू संघाबाहेर होशील. ‘आता पुरे’ असं वाटू देऊ नकोस! पस्तिशी म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे पटवून देणारी दोन उत्तम उदाहरणं तर समोर आहेतच!

तुला मनापासून शुभेच्छा!

Comments are closed.