पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बोलले, हिंदुस्थानचे पंतप्रधान बदलणार! राजकारण्यांच्या ‘रासलीलां’च्या एपस्टीन फाईल्स शुक्रवारी सादर होणार

येत्या 19 डिसेंबर रोजी अमेरिकी संसदेत ‘एपस्टीन फाईल्स’ सादर केल्या जाणार असून त्यातून राजकारण्यांच्या रासलीला जगापुढे येणार आहेत. हिंदुस्थानातील तीन आजी-माजी खासदारांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात उलथापालथ होऊन पंतप्रधानपदावरील व्यक्तीही बदलली जाऊ शकते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. अमेरिकेत जेफ्री एपस्टीन नावाचा एक उद्योजक 1995-96 मध्ये  प्रकाशझोतात आला होता. तो मानवी तस्करी व अल्पवयीन मुलींचा बेकायदा धंदा करायचा हे उघड झाले. त्याने अनेक राजकीय नेत्यांना हनीट्रपमध्ये अडकवून त्यांचे व्हिडीओही रेकॉर्ड केले होते. पीडितांच्या तक्रारी व चौकशीनंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. काही दिवसांनी त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला. ती आत्महत्या असल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र त्यावरून वाद निर्माण झाला. त्याची दखल घेऊन ट्रम्प यांनी एपस्टीनसंबंधित गोपनीय फाईल्स खुल्या करण्याची घोषणा केली आहे. त्या फाईल्स 19 डिसेंबरला खुल्या होणार आहेत. त्यानंतर बऱयाच घडामोडी घडतील, असे चव्हाण म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्याच दिवशी पराभव!

‘हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा दहापट मोठी असूनही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला. पंतप्रधान मोदींनी लष्करी कारवाई थांबवण्यास सांगितल्याने हिंदुस्थानला मोठा फटका बसला. ‘पंतप्रधानांवर नेमका कोणत्या प्रकारचा दबाव आहे याचा शोध देशाने घेतला पाहिजे,’ असे चव्हाण म्हणाले.

Comments are closed.