What is ABV in Alcohol : दारूच्या बाटलीवरचा % ABV आकडा काय सांगतो? पिण्यापूर्वी जाणून घ्या हा महत्त्वाचा अर्थ
डिसेंबर महिना सुरू झाला की थंडी, पार्टी आणि सेलिब्रेशन यांचा माहोल तयार होतो. वर्षाअखेरच्या पार्ट्यांमध्ये अनेकजण मित्रांसोबत ड्रिंक करतात. काही लोक नेहमी दारू पितात, तर काहीजण खास प्रसंगीच. पण दारू घेताना आपण बहुतेक वेळा फक्त ब्रँड, चव किंवा किंमत पाहतो. मात्र बाटलीवर लहान अक्षरात लिहिलेला एक आकडा असतो, जो फार महत्त्वाचा असतो. तो म्हणजे % ABV. बहुतेक लोक या ABV कडे लक्षच देत नाहीत. पण प्रत्यक्षात हाच आकडा सांगतो की तुम्ही पित असलेले पेय किती ताकदवान आहे आणि ते शरीरावर किती लवकर परिणाम करू शकते. (what does abv mean on alcohol bottle in marathi)
ABV म्हणजे काय?
ABV म्हणजे Alcohol By Volume. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर एखाद्या दारूच्या बाटलीत एकूण द्रवामधील किती टक्के भाग शुद्ध अल्कोहोल आहे, हे ABV दाखवतो. उदाहरणार्थ, एखाद्या बिअरवर 5% ABV लिहिले असेल, तर त्या बिअरमध्ये 5 टक्के अल्कोहोल आणि उरलेले पाणी व इतर घटक असतात.
वेगवेगळ्या दारूंमध्ये ABV वेगवेगळा असतो
सर्व दारू एकसारखी नसते. बिअरमध्ये साधारण 4 ते 6 टक्के ABV असतो. वाईनमध्ये 10 ते 14 टक्के ABV असू शकतो. तर व्हिस्की, रम किंवा व्होडका यामध्ये साधारण 40 टक्के ABV असतो. म्हणजेच एक ग्लास व्हिस्की आणि एक ग्लास बिअर यांचा परिणाम सारखा नसतो, कारण अल्कोहोलचे प्रमाण खूप वेगळे असते.
ABV जास्त असेल तर काय फरक पडतो?
ABV जितका जास्त, तितकी दारू अधिक स्ट्रॉंग असते. कमी प्रमाणात घेतली तरी नशा लवकर चढू शकते. त्यामुळे ABV माहिती असणे हे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा लोक नकळत जास्त स्ट्रॉंग दारू घेतात आणि त्याचे परिणाम शरीरावर लवकर दिसू लागतात.
कायदेशीरदृष्ट्या ABV का महत्त्वाचा आहे?
अनेक देशांमध्ये आणि राज्यांमध्ये दारूच्या विक्रीसाठी ABV चे नियम ठरलेले असतात. कोणत्या दारूला किती टक्के अल्कोहोल असू शकतो, यावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे बाटलीवर ABV लिहिणे बंधनकारक असते, जेणेकरून ग्राहकाला स्पष्ट माहिती मिळेल.
पार्टीमध्ये किंवा दुकानात दारू घेताना फक्त ब्रँड किंवा किंमत पाहू नका. बाटलीवरील % ABV नक्की पाहा. हा आकडा तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखायला मदत करतो.
Comments are closed.