उत्तर प्रदेशमध्ये 8 बस आणि 3 कारची धडक होऊन 13 जणांचा मृत्यू झाला.
द्रुतगती मार्गावर दाट धुक्यामुळे भीषण दुर्घटना : 70 जण जखमी
► वृत्तसंस्था/ मथुरा
उत्तरप्रदेशच्या मथुरेमध्ये यमुना द्रुतगती मार्गावर दाट धुक्यामुळे 8 बसेस आणि 3 कार्सची टक्कर झाली आहे. टक्कर होताच या वाहनांमध्ये आग लागली. यामुळे एका भाजप नेत्यासह 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख पटविणे देखील अवघड ठरले आहे. तर 70 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पहाटे दाट धुक्यामुळे ही मोठी रस्ते दुर्घटना घडली आहे. मृतांपैकी केवळ 4 जणांची ओळख पटू शकली आहे. दुर्घटनेवेळी महामार्गावरील दृश्यता जवळपास शून्य होती. दाट धुक्यामुळे एकामागोमाग एक 8 बसेस आणि 3 कार्स परस्परांवर आदळल्या. टक्कर अत्यंत भीषण असल्याने अनेक वाहनांमध्ये स्फोट होत आग लागली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि यमुना एक्स्प्रेस वे प्राधिकरणाच्या टीम्सनी तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला तसेच जखमींना वाहनांमधून बाहेर काढत रुग्णालयात हलविले.
जखमींना मथुरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना आग्रा येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भीषण रस्ते दुर्घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी दुर्घटनेची कारणे आणि भविष्यात अशाप्रकारच्या दुर्घटना रोखण्यासाठीच्या उपायांवर चौकशी अहवाल सादर करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत प्रशासन करणार आहे.
Comments are closed.