भारतात ज्यूंवर हल्ले होण्याची भीती

सिडनी हल्ल्यानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी ज्यूधर्मीयांना दहशतवादी संघटनांकडून लक्ष्य करण्यात येण्याची शक्यता पाहता उच्चस्तरीय अलर्ट जारी केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. सिडनी येथे दोन दहशतवाद्यांनी हनुक्का सण साजरा करण्यासाठी जमलेल्या ज्यूधर्मीयांवर बेछूट गोळीबार केला होता, यात 16 जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी खासकरून दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरमध्ये सतर्क राहण्याची सूचना केली आहे. दहशतवादी हल्ल्याशी निगडित  गुप्तचर माहिती मिळाल्यावर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ज्यू भागांमध्ये करडी नजर

ज्यूंची प्रार्थनास्थळे, इस्रायली संस्था आणि इस्रायली तसेच ज्यूधर्मीय राहत असलेल्या नागरी भागांवर नजर ठेवली जातेय. भारतात राहत असलेले इस्रायली नागरिक आणि त्यांच्या मुलांनाही दहशतवादी संघटना लक्ष्य करू पाहत असल्याचे समोर आले आहे. भारतात इस्रायलचा दूतावास दिल्लीत आहे, तर मुंबई आणि बेंगळूरमध्ये त्याचे वाणिज्य दूतावास आहेत.

ज्यू समुदायही सावध आहे

भारतात सुमारे 4000 ज्यूधर्मीय राहतात. यात भारतीय ज्यूंसोबत अन्य देशांमधून आलेले ज्यू सामील आहेत. ज्यू जीवनाचे केंद्र मुख्यकरुन मुंबई आहे, तेथे सिनेगॉग, डे स्कूल आणि कोषेर भोजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. येथे कौन्सिल ऑफ इंडियन ज्यूरी प्रमुख प्रतिनिधी संस्था आहे. याचबरोबर बी’ नाई ब्रिथ (ज्यू क्लब), बिकुर चोलिम, विमेन्स इंटरनॅशनल जायोनिस्ट ऑर्गनायजेशन आणि हदासा यासारख्या संस्थाही सक्रीय आहेत. याचबरोबर दरवर्षी सुमारे 50 हजार इस्रायली नागरिक भारताला भेट देत असतात.

 

Comments are closed.