सिडनीत गोळीबार करणारा साजिद हैदराबादचा, तेलंगणा पोलिसांची माहिती; शिक्षण पूर्ण करून देश सोडला

सिडनीच्या बॉन्डी बीचवर हनुक्का सण साजरा करणाऱ्या ज्यू नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ठार झालेला साजिद अक्रम हा हिंदुस्थानी नागरिक होता आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील रहिवासी होता. त्याच्याकडे हिंदुस्थानी पासपोर्ट होता.
14 डिसेंबर रोजी झालेल्या सिडनी दहशतवादी हल्ल्यात साजिद अक्रम घटनास्थळीच मारला गेला होता. तो पाकिस्तानी नागरिक असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तेलंगणा पोलिसांनी त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती उघड केली. तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी सांगितले की, अक्रम हा हैदराबादचा रहिवासी होता. त्याने बी.कॉम. ही पदवी हैदराबादमधून घेतली. त्यानंतर तो विद्यार्थी व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियात गेला. तेथे त्याने युरोपियन वंशाच्या ख्रिश्चन महिलेसोबत लग्न केले. त्याच्याविरोधात हिंदुस्थानात कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही. त्याच्या कट्टरपंथी होण्यामागे हिंदुस्थानशी कोणताही संबंध नाही, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
'सुपर हिरो' अहमदला भेटले पंतप्रधान अल्बानीज
गोळीबार करणाऱया साजिदसोबत कोणताही विचार न करता भिडणाऱया ऑस्ट्रेलियाचा नवा सुपर हीरो अहमद अल अहमद याला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज रुग्णालयात जाऊन भेटले. अहमद हे एक खरे ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत.
नातेवाईक म्हणतात, आम्ही संबंध तोडले
साजिदचे हैदराबादमधील नातेवाईक यासंदर्भात म्हणाले की, गेल्या 27 वर्षांमध्ये त्याच्याशी फार संबंध आला नाही. तो फक्त सहा वेळा हिंदुस्थानात आला होता. 2009 मध्ये वडिलांचे निधन झाले त्यावेळीही तो हिंदुस्थानात आला नव्हता. त्याने ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यामुळे आम्ही त्याच्याशी अनेक वर्षांपूर्वी संबंध तोडले होते. 2022मध्ये तो हिंदुस्थानात आला होता. साजिद आणि नवीद यांच्या कट्टरपंथी विचारांबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

Comments are closed.