Plants Buying Tips: नर्सरीतून रोपं खरेदी करताना टाळा ‘या’ चुका; नाहीतर घरी आणताच जातील कोमेजून
बऱ्याचदा नर्सरीतून एखादं रोप खरेदी करताना हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले पाहून आपण मोहून जातो. उत्साहाच्या भरात काही गोष्टी न तपासता रोपं खरेदी करतो. पण घरी गेल्यावर काही दिवसांतच ती रोपं सुकू लागतात किंवा कोमेजून जातात. याचे मुख्य कारण म्हणजे रोप खरेदी करताना आपण केलेल्या काही छोट्या चुका ठरू शकतात. त्यामुळं नर्सरीतून रोप खरेदी करताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबद्दल जाणून घेऊया… ( Avoid These Mistakes while Buying a Plant From Nursery )
बहुतेक लोक नर्सरीमध्ये गेल्यावर ज्या रोपाला सर्वात जास्त फुले असतील तेच निवडतात. मात्र ही एक मोठी चूक आहे. जास्तीत जास्त फुले असणाऱ्या रोपाची वाढ कमी झालेली असते. त्यामुळं जास्तीत जास्त कळ्या असलेले रोप निवडा. यामुळे घरी त्या रोपाची वाढ होते आणि कळ्यांची फुलं उमलतात. तसेच रोप खरेदी करताना नेहमी नवीन पानं फुटत असलेलं घ्यावं. कारण पानं फुटणं हे निरोगी रोपाचं लक्षण मानलं जातं.
वरवर रोप सुंदर दिसत असले तरी त्याची मुळं कमकुवत असू शकतात. अनेकदा रोपं ‘रूट बाउंड’ झालेली असतात. याचा अर्थ असा की नर्सरीत रोपाची मुळं कुंडीत किंवा प्लास्टिक पिशवीत अडकलेली असतात. अशी रोपे घरी लावल्यावर त्यांची वाढ खुंटते. अशा वेळी पिशवी किंवा कुंडीतून बाहेर आलेली मुळं तपासा ती काळी पडली असतील किंवा कुजल्यासारखी वाटत असतील, तर ते रोप घेणं टाळा.
कधीकधी आतून रोपांवर कीटकांचा प्रादुर्भाव असू शकतो. एखाद्या पाने पिवळी असणे, पानांच्या मागे पांढरे ठिपके असणं ही त्याला कीड लागल्याची लक्षणं आहेत. त्यामुळं रोपं घेताना त्याची पानं व्यवस्थित तपासा. कारण अशा प्रकारचं रोप घर आणल्यास इतर रोपांना कीड लागण्याचा धोका असतो.
हेही वाचा: Gardening Tips : स्वयंपाक घरातील हा पदार्थ आहे झाडांसाठी वरदान
आपण अनेकदा विदेशी किंवा शोभेची झाडे केवळ सजावटीसाठी घेतो. पण प्रत्येक झाडाची वाढ ही एका विशिष्ट हवामानात होत असते. म्हणजेच एखाद्या रोपाला वाढीसाठी कमी सूर्यप्रकाश लागत असेल आणि तुम्ही ते ते रोप तुमच्या बागेत उन्हात ठेवलं तर ते मरू शकतं. त्यामुळं या गोष्टींचा विचार करून रोप खरेदी करा.
नर्सरीतून रोप आणल्या आणल्या लगेच दुसऱ्या कुंडीत लावण्याची घाई करू नका. नर्सरी आणि तुमच्या घरचे वातावरण यात फरक असतो. त्यामुळं रोप आणल्यानंतर किमान ४-५ दिवस झाल्यावर त्याचे पुनर्रोपण करा.
Comments are closed.