भाजपला शह देण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंचा खास प्लॅन, सगळे पत्ते शेवटच्या क्षणी उघडणार, नेमकं काय

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. भाजपनेही यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर (BMC Election 2026) कब्जा करायचा, असा चंग बांधला आहे. यासाठी भाजपने (BJP) जय्यत तयार केली असून ठाकरे बंधूंची (Thackeray brothers) कोंडी करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब भाजपकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपकडून मनसे (MNS) आणि ठाकरे गटातील नाराज नेत्यांना गळाला लावले जाऊ शकते. हा धोका ओळखून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक खास रणनीती आखली आहे. (BMC Election 2026)

येत्या 23 डिसेंबरपासून मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यास दोन्ही पक्षांतील नगरसेवकपदाच्या इच्छूक उमेदवारांपैकी एकालाच संधी मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर केल्यास मनसे-ठाकरे गटातील नाराज नेते शेवटच्या क्षणी भाजपमध्ये जाऊ शकतात.  हा दगाफटका टाळण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी युतीची घोषणा केली जाईल. 22 किंवा 23 डिसेंबर रोजी भव्य मेळावा घेऊन राज आणि उद्धव यांच्याकडून मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होईल. त्यामुळे नगरसेवकपदाची उमेदवार न मिळालेल्या नाराजांना भाजप किंवा शिंदे गटाशी वाटाघाटी करण्यासाठी फार वेळ मिळणार नाही. त्यामुळे संभाव्य बंडखोरी कमी होईल.

याशिवाय, मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपानंतर ज्या उमेदवाराचे नाव अंतिम होईल ते लगेच जाहीर न करता संबंधित उमेदवाराला पक्षाकडून फोन करण्यात येईल. यानंतर त्याला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला जाईल. उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणी जाहीर झाल्यास बंडखोर उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती जुळवाजुळव करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी कमी वेळ मिळेल, अशी रणनीती राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आखण्यात आली आहे. भाजपची सध्याची ताकद पाहता त्यांच्याकडे विविध प्रलोभनं दाखवून राजकीय फोडाफोडी करण्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा आहे. या यंत्रणेकडून सातत्याने इतर पक्षातील नाराजांचा शोध सुरु असतो. हा धोका ओळखून ठाकरे बंधुंनी शेवटच्या क्षणी आपले सर्व पत्ते उघड करण्याचा मार्ग अवलंबल्याचे बोलले जात आहे.

BMC Election 2026: मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप ठरलं

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी युती आणि जागावाटपासंदर्भातील ‘शिवतीर्था’वर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी राज यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे आज त्यांच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करतील व साधारण गुरुवारी ठाकरे बंधू युतीची घोषणा करतील, असे मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दोन्ही पक्षांतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितरीत्या या संदर्भातील घोषणा करतील, असे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

आणखी वाचा

मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती! शिवसेना 70% नव्या चेहऱ्यांना संधी देणार, युवा नेत्यांसह वरिष्ठही आग्रही

आणखी वाचा

Comments are closed.