Dal Benefits: तूर, मूग, उडीद, चणा आणि मसूर; पोषणतज्ञांनी सांगितलं कोणती डाळ कधी खावी?

डाळी या आपल्या भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहेत. दिवसातून एकदा तरी आहारात डाळींचा समावेश असतो. डाळींचे तूर, मूग, उडीद, चणा आणि मसूर असे वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येक डाळीचे वेगवेगळे फायदे शरीराला होत असतात. पण यापैकी कोणती डाळ कधी आणि कशाप्रकारे खावी याबाबत पोषणतज्ञांनी सल्ला दिला आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया…

तूर डाळ
तूर डाळ ही जवळपास सर्वांना आवडते. पोषणतज्ञ सल्ला देतात की तूर डाळ नेहमी एक तास भिजवून हळद आणि हिंग घालून शिजवावी. यामुळे ती पचण्यास सोपी होते आणि पोटफुगी, गॅस यांसारख्या समस्या होत नाहीत. तसेच दुपारच्या जेवणात तूर डाळीचा समावेश करावा.

मूग डाळ
वजन कमी करण्यासाठी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि वृद्धांसाठी ही डाळ खूप फायदेशीर मानली जाते. रात्रभर भिजवून मोड आलेले मूग आहारात समाविष्ट करावे. मूग आहारात दुपारी किंवा रात्री कधीही घेऊ शकता.

उडदाची डाळ
उडीदाची डाळ ताकद, हाडे आणि सहनशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे, पण ती पचायला जड असते. त्यामुळं ती नेहमी रात्रभर भिजवून आंबवून आहारात घ्यावी. त्यात पचण्यासाठी हिंग आणि आलं घालावं. दुपारच्या जेवणात ही डाळ खाण्याची शिफारस पोषणतज्ञ करतात.

हेही वाचा: Bajra Benefits: संधिवात आणि सांधेदुखीने हैराण आहात? दररोज आहारात घ्या ‘ही’ भाकरी

चणा डाळ
चणा डाळ फायबरने समृद्ध असते आणि मधुमेहासाठी फायदेशीर असते. ती २-३ तास ​​किंवा रात्रभर भिजवून दुपारच्या जेवणात खावी. मात्र चणा डाळ भिजवल्याशिवाय कधीही खाऊ नये आणि लहान मुलांना ही डाळ जास्त प्रमाणात देणं टाळावं.

पिवळी मूग डाळ
ही सर्वात हलकी डाळ असते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी असलेल्यांना ही डाळ द्यावी. पोषणतज्ञांच्या मते, तुम्ही दिवसभरात कधीही पिवळी मूग डाळ खाऊ शकता.

मसूर डाळ
मसूर डाळ लोहाने समृद्ध असते आणि ती महिलांसाठी फायदेशीर असते. ही सर्व डाळींमध्ये लवकर शिजणारी डाळ आहे. तुम्ही ती दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात दोन्ही वेळी खाऊ शकता. मात्र किडनी स्टोन असलेल्यांनी नियमितपणे मसूर डाळ खाऊ नये.

Comments are closed.